हवामान बदलाचा अमेरिकेला मोठा फटका! राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचं म्हणत बायडन यांनी केली मोठी घोषणा
US President Joe Biden On Climate Change : अमेरिकेला हवामान बदलाचा देखील मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा करत यावर चिंता देखील व्यक्त केली आहे.
US President Joe Biden On Climate Change : जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक असणाऱ्या अमेरिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील महागाईचा संपूर्ण जगावर परिणाम होणार आहे. सोबतच अमेरिकेला हवामान बदलाचा देखील मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठी घोषणा करत यावर चिंता देखील व्यक्त केली आहे. युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये उष्णतेच्या लाटा पसरत असताना हवामान बदलाचा सामना करण्याबाबत बायडन यांनी भाष्य केलं.
बायडन म्हणाले की, अमेरिकेतील 100 दशलक्ष लोक सध्या अत्याधिक उष्णतेचा सामना करत आहेत. हा हवामान बदल एक स्पष्ट आणि सध्याचा मोठा धोका आहे. हवामान आपत्तींना तोंड देण्यासाठी यूएस पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 2.3 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह कृती कार्यक्रमाची घोषणा करत असल्याचं बायडन म्हणाले.
बायडन म्हणाले की, आपल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.आपली राष्ट्रीय सुरक्षा देखील धोक्यात आहे आणि आपली अर्थव्यवस्था धोक्यात आहे. त्यामुळे आपल्याला ही तत्काळ कार्यवाही करावी लागणार आहे. ही एक प्रकारची आणीबाणी आहे आणि मी त्याकडे त्या दृष्टीने पाहीन. अध्यक्ष या नात्याने मी माझ्या कार्यकारी अधिकारांचा वापर हवामानाच्या संकटाचा सामना करण्यासाठी करेन, असंही ते म्हणाले.
बायडन यांनी म्हटलं की, हवा आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी आमच्या लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी चांगल्या ऊर्जा निर्मितीसाठी मी वाट्टेल ते करेल, आमचं भविष्य यावर अवलंबून आहे, असंही ते म्हणाले. जागतिक स्तरावर देखील यासाठी प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी म्हटलं.
औपचारिक हवामान आणीबाणी घोषित करण्याचा निर्णयाबाबत लवकरच सांगितलं जाईल, असंही ते म्हणाले. बायडन यांनी जागतिक हवामान संकटाचा सामना करण्यासाठी मोहिम राबवण्याचं आश्वासन देऊन आपला कार्यकाळ सुरू केला होता, परंतु सध्याचा धोका पाहता त्यांच्या अजेंड्याला धक्का बसला आहे, असं मानलं जात आहे.
राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार घेताच बायडन यांनी युनायटेड स्टेट्सला पॅरिस हवामान करारात परत आणण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर त्यांनी 2030 पर्यंत यूएस हरितगृह वायू प्रदूषणात 2005 च्या पातळीपासून 50-52 टक्के घट करण्याचे लक्ष्य असल्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली होती.