Donald Trump : ट्रम्प निवडून आल्यानंतर भारतावर आणि जगावर काय परिणाम होणार? कुणाच्या खिशाला झळ बसणार?
US Election Results : इस्लामिक दहशतवादाला ट्रम्प यांचा कडाडून विरोध आहे. आता ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पाकिस्तान अधिक अडचणीत येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
US Election Results : जगातली एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे अध्यक्ष होणार आहेत. 20 जानेवारी 2025 रोजी ट्रम्प अध्यक्षपदाची शपथ घेतील. अमेरिकेच्या निवडणुकीकडे नेहमीप्रमाणं सर्व जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस ही चर्चा अनेक घरांमध्ये, कार्यालयांमध्ये एवढंच काय तर गावाच्या चावडीवरही रंगली होती. सतत वाढणारी महागाई, बेरोजगारी, अन्य देशांमधून येणारे स्थलांतरित, बेकायदेशीररित्या सीमा ओलांडून येणारे मेक्सिकन नागरिक, ड्रग्जची समस्या अशा अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली.
अमेरिकेतील दरडोई उत्पन्न हे भारताच्या तुलनेत 32 पटीनं जास्त आहे. मग तिथल्या लोकांना महागाईची झळ कशी बसते, असा प्रश्न काहींना पडू शकतो. पण अर्थकारण तसं चालत नाही. एक तर दरडोई उत्पन्न हा सरासरी आकडा असतो, आणि दुसरं म्हणजे अनेक देशांमध्ये नागरिकांचं उत्पन्न जास्त असलं तरी तिथलं राहणीमानही तितकंच महाग असतं. त्यामुळं महागाई आणि बेरोजगारीचा फटका अनेक अमेरिकन नागरिकांना बसतोय, हे नाकारता येणार नाही.
दरम्यान अमेरिकेच्या निकालाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प जिंकल्यानंतर भारतावर आणि जगावर त्याचा परिणाम होणार आहे.
ट्रम्प पुन्हा सत्तेवर येण्याचा भारतावर काय परिणाम होणार?
- अमेरिकेत जाण्यासाठी लागणारा H1-B व्हिसा मिळणं कठीण होण्याची शक्यता.
- काही चिनी उत्पादनांवर बंदी घातली तर भारतीय उद्योजकांसाठी चांगली संधी असेल.
- तेलाचे भाव कमी झाल्यास भारताला मोठा फायदा होणार.
- अमेरिकेचा चीनविरोध पाहता भारताला अत्याधुनिक अमेरिकन संरक्षण तंत्रज्ञान मिळू शकतं.
- अमेरिकन फार्मा क्षेत्रातील नियम ट्रम्प यांनी शिथिल केल्यास भारतीय औषध कंपन्यांना मोठी संधी.
ट्रम्प यांच्या विजयानंतर जगावर काय परिणाम?
- इस्रायलची हिंमत वाढणार, त्यामुळे पश्चिम आशियात तणाव वाढू शकतो.
- इराणीशी ओबामांनी केलेला करार ट्रम्प यांनी रद्द केला होता. त्यामुळे अमेरिका-इराण संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता.
- याचा दुसरा परिणाम म्हणजे इराणला धडा शिकवण्याची इस्रायलची खुमखुमी वाढू शकते.
- चीन आणि अमेरिकेत पुन्हा एकदा व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता .
- पुतिन माझे चांगले मित्र आहेत असा दावा ट्रम्प वारंवार करतात.
- 'रशिया-युक्रेन युद्ध मी तासाभरात संपवू शकतो' असा दावा देखील ट्रम्प यांनी केला आहे.
- म्हणूनच, रशिया-युक्रेन युद्धाची दिशा बदलते का, किंवा तोडगा निघतो का ते पाहावं लागेल.
- इस्लामिक दहशतवादाला ट्रम्प यांचा कडाडून विरोध आहे, त्यामुळे पाकिस्तान अधिक अडचणीत येऊ शकतो.
'- नाटो' या सर्वात ताकदवान लष्करी आघाडीतून अमेरिकेची सदस्यता रद्द करण्यासाठी हालचाली सुरू होऊ शकतात.
ही बातमी वाचा :