Iran vs Israel war: अमेरिकेने संहारक हल्ला केला पण इराणशी लढणं वाटतं तितकं सोपं नाही कारण... भारताच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं कारण
Iran vs Israel war: इराण अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हार मानेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, इराणने अवघ्या काही तासांमध्ये इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरु केला आहे.

Iran vs Israel war: इराण आणि इस्रायल यांच्यात गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या लष्करी संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेच्या बी-2 स्टील्थ बॉम्बर्स या विमानांनी शनिवारी रात्री इराणमधील (Iran) तीन लष्करी तळांवर हल्ला केला. यानंतर इराण युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने पावले टाकेल, अशी अपेक्षा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना होती. मात्र, इराणने हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये सावरत इस्रायलवर (Israel) प्रतिहल्ला चढवला आहे. सध्या इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा (Missile Attack) सुरु आहे. त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्याने इराण घाबरुन जाईल, हा अंदाज साफ चुकला आहे. यासंदर्भात भारतीय लष्करातील निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हा वाद आणखी चिघळून मध्यपूर्वेतील संघर्ष वाढेल, असा अंदाज निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी व्यक्त केला.
अमेरिकने इस्रायलच्या आण्विक तळांवर हल्ला केला असला तरी इराणकडे लढण्याची भरपूर क्षमता आहे, असे निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सांगितले. इराणने जमिनीच्या खाली अगदी खोलवर आपल्या लष्करी सुविधा उभारल्या आहेत. यामध्ये आण्विक तळ, शस्त्रासं आणि क्षेपणास्त्र साठवण्याच्या जागा उभारल्या आहेत. त्यामुळे इराणकडे दीर्घकाळ लढण्याची क्षमता आहे, असे महाजन यांनी सांगितले.
इराणने आपल्या शस्त्राज्ञांचा साठा वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवला आहे. इस्रायलची गुप्तचर संघटनेने इराणमध्ये आपले जाळे विणले असले तरी हे शस्त्रास्त्रांचे हे साठे नक्की कुठे आहेत, याची नेमकी माहिती त्यांना नाही. तसेच अमेरिकेने जमिनीखालील बंकर्स नष्ट करण्याची क्षमता असलेले एमओएबी बॉम्ब टाकले असले तरी शनिवारच्या हल्ल्यात इराणचे आण्विक तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत, याबद्दल खात्री नाही. अमेरिकेने टाकलेले बॉम्ब जमिनीच्या खाली खोलवर असलेल्या गोष्टी नष्ट करत असले तरी इराणच्या लष्करी सुविधा जमिनीच्या नेमक्या किती खाली आहेत, हे कोणालाही माहिती नाही. इस्रायलकडे जमिनीच्या खाली असणाऱ्या इराणच्या या लष्करी सुविधा उद्ध्वस्त करणारी अस्त्रं नव्हती. त्यामुळे अमेरिकेने या युद्धात उडी घेत शनिवारी इराणवर संहारक असा बॉम्बहल्ला केला होता. त्यामुळे इराण युद्ध थांबवून शरणागती पत्कारेल, अशी ट्रम्प यांची अपेक्षा होती. मात्र, या हल्ल्यानंतर लगेचच सावरत इराणने इस्रायलच्या प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरु केला आहे. त्यामुळे इराण लवकर शरणागती पत्कारेल, हा डोनाल्ड ट्रम्प यांचा अंदाज साफ चुकला आहे. उलट इराण आणखी इरेला पेटून इस्रायल आणि अमेरिकेवर हल्ले करण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा























