Iran vs Israel War: अमेरिकेच्या हल्ल्याने संतापलेल्या इराणचा प्रतिहल्ला, इस्रायलमध्ये सायरनचा आवाज, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं
Iran vs Israel War: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संतापलेल्या इराणने आता इस्रायलवर एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्र डागायला सुरुवात केली आहे. इराणने इस्रायलवर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं डागली आहेत.

Iran vs Israel War: अमेरिकेने तीन महत्त्वाच्या आण्विक तळांवर हल्ला चढवल्यानंतर संतापलेल्या इराणने आता प्रतिहल्ला सुरु केला आहे. इराणने इस्रायलवर हल्ले सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, इस्रायलची राजधानी असलेल्या जेरुसलेम आणि तेल अविव या दोन शहरांवर इराणने हल्ला चढवला आहे. इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी इराणने जेरुसलेम आणि तेल अविव या शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यापैकी अनेक क्षेपणास्त्रे इस्रायलने रोखली आहेत. मात्र, इराणची सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, इराणने (Iran) डागलेली दहा क्षेपणास्त्रं इस्रायलमध्ये कोसळली आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून इस्रायलच्या (Israel) दिशेने एकूण 30 क्षेपणास्त्रं डागण्यात आली. ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इराणच्या या हल्ल्यात इस्रायलचे किती नुकसान झाले आहे, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
इराणी लष्कराच्या दाव्यानुसार, त्यांनी डागलेली क्षेपणास्त्रं इस्रायलमधील बेन गुरियन विमानतळ आणि अन्य ठिकाणांवर जाऊन आदळली आहे. इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार, या हल्ल्यात 11 जण जखमी झाले आहेत. मात्र, इस्रायलमध्ये केवळ एकाच ठिकाणी इराणच्या क्षेपणास्त्राने लक्ष्यभेद केला आहे. इतर क्षेपणास्त्र रोखण्यात आली आहेत. इराणने आतापर्यंत दोन टप्प्यांत इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागल्याची माहिती आहे.
#BREAKING Iran says targeted Ben Gurion airport, other sites in attack on Israel. Israel's rescue services say at least 11 people were hurt and at least one impact was reported in central Israel after Iran launched two waves of missiles pic.twitter.com/s6glsXQZhu
— AFP News Agency (@AFP) June 22, 2025
शनिवारी रात्री अमेरिकेने इराणमधील फोर्डो,नातांझ आणि एसफहान हे तीन आण्विक तळ (Nuclear sites) बॉम्ब हल्ला करुन उद्ध्वस्त केले होते. गेल्या नऊ दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरु आहे. मात्र, इस्रायलला इराणच्या जमिनीखालील लष्करी तळ आणि आण्विक सुविधा नष्ट करता आल्या नव्हत्या. त्यामुळे अमेरिकेला या युद्धात उतरावे लागले. अमेरिकेने अत्यंत विध्वंसक अशा MOAB या बॉम्बचा मारा इराणमधील आण्विक तळांवर केला होता. यानंतर आता इराणने प्रतिहल्ल्यांना सुरुवात केली असून त्याचे पहिले लक्ष्य इस्रायल ठरला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात इस्रायलची आयर्न डोम ही हवाई सुरक्षा यंत्रणा अभेद्य मानली जात होती. या सुरक्षा यंत्रणेमुळे शूत्रने डागलेली क्षेपणास्त्रे इस्रायलमध्ये फार आतपर्यंत शिरली नव्हती. मात्र, इराणी लष्कराची क्षेपणास्त्रे तेल अविव आणि जेरुसलेम येथील काही भागांना लक्ष्य करण्यात यशस्वी ठरली होती.
आणखी वाचा
अमेरिकेने इराणवर 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' का टाकला? इराणने जमिनीखाली नेमकं काय लपवलंय?























