Russia Ukraine Crisis : युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती; भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू
Russia Ukraine Crisis : युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे.
Russia Ukraine Crisis : युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. आता युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनमधील रशिया समर्थित फुटीरतावादी प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. रशियाच्या या निर्णयामुळे युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाच्या पाश्चात्य देशांच्या भीतीने तणाव आणखी वाढणार आहे. या धोक्यांमुळे भारत युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याची योजना तयार करत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक विमान कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार युक्रेनला अतिरिक्त उड्डाणे पाठवेल आणि भारतीय नागरिकांना मायदेशी परत येण्यासाठी सुविधा उपलब्ध करू देईल. यासोबतच युक्रेनची राजधानी कीवमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारने घेतला आहे. कीव येथील भारतीय दूतावासाच्या नियंत्रण कक्षात 24 तास सेवा उपलब्ध असेल.
युक्रेनमध्ये किती आहेत भारतीय नागरिक?
युक्रेनमध्ये जवळपास 20,000 भारतीय नागरी आहेत. ज्यामध्ये अधिकतर हे वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. कीवमधील भारतीय दूतावासाने युक्रेनमधील विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. जेणेकरून युक्रेनमध्ये किती भारतीय विद्यार्थी शिकत आहेत हे कळेल. त्याचा उद्देश असा होता की, जर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झाल्यास भारतीय विद्यार्थ्यांना तेथून तात्काळ बाहेर काढण्यास मदत होईल. याशिवाय तीन विशेष चार्टर्ड फ्लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय दूतावासाने घोषणा केली की एअर इंडिया 22, 24 आणि 26 फेब्रुवारी रोजी कीव आणि दिल्ली दरम्यान तीन उड्डाणे चालवेल.
भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला
कीवमधील भारतीय दूतावासाने एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. ज्यात सांगण्यात आले आहे की, युक्रेनमधील वाढता तणाव आणि अस्थिरता लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांना (ज्यांना येथे राहण्याची गरज नाही) आणि सर्व विद्यार्थ्यांना तात्पुरते युक्रेन सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थ्यांना चार्टर फ्लाइट माहितीसाठी संबंधित विद्यार्थी कंत्राटदारांच्या संपर्कात राहण्याचा आणि अपडेट्ससाठी दूतावासाच्या फेसबुक, वेबसाइट आणि ट्विटरवर नियमितपणे लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: