Ukraine Russia War : अमेरिकेकडून रशियावर आणखी निर्बंध ; गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियावर नवीन निर्बंधांची घोषणा केली आहे. रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा जो बायडन यांनी केली आहे.
Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे अमेरिका रशियावर सातत्याने निर्बंध जाहीर करत आहे. मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी राष्ट्राला संबोधित करत असताना रशियावर नवीन निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे रशियन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी केला आहे.
"आम्ही रशियन गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालत आहोत. आम्ही इतिहासातील आर्थिक निर्बंधांचे सर्वात महत्त्वाचे पॅकेज लागू करत आहोत आणि यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण नुकसान होईल. आमचे अनेक युरोपियन सहयोगी आणि भागीदार आमच्या या निर्णयात सहभागी होण्याच्या स्थितीत नसतील हे समजून आम्ही पुढे जाऊ," असे जो बायडन यांनी म्हटले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांकडून होणारी आयात कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे पाऊल उचलले आहे. आर्थिक क्षेत्रांवर कठोर निर्बंध घालण्यात आले असूनही रशियाकडून होणारी ऊर्जा निर्यात स्थिर आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 13 दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. दोन्ही देशांतील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याचा युक्रेनकडून कडवा प्रतिकार सुरू आहे. रशियन सैन्याचा एक वरिष्ठ अधिकारी युद्धात ठार झाला असल्याचा दावा युक्रेनने आजा केला आहे. 'द कीव्ह इंडिपेंडेट' ने रशियन संरक्षण मंत्रालयाच्या गुप्तचर विभागाच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. रशियन सैन्यातील मेजर जनरल व्हिटाली गेरासिमोव्ह ठार झाले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या