Turkey Earthquake : तुर्किए पुन्हा हादरलं, 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 66 तासात 37 धक्के
Turkey Earthquake : मध्य तुर्किएमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर हा भूकंप 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.
Turkey Earthquake : आधीच संकटात असलेल्या तुर्किए देशाला आणखी संकटाचा सामना करावा लागत आहे. शनिवारी, तुर्किए देशामध्ये (Turkey Earthquake) पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले. मध्य तुर्किएमध्ये आलेला हा भूकंप 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता, अशी माहिती युरोपीयन-भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने (European-Mediterranean Seismological Centre) दिली.
'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जमिनीपासून 10 किमी खोल अंतरावर हे धक्के जाणवले. मध्य तु्र्किएमध्ये मागील 66 तासात हा 37 वा भूकंपाचा धक्का होता. तुर्किए आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपामुळे 50,000 हून अधिक लोक मारले गेले आणि हजारो घरे उद्ध्वस्त झाले आहेत. यातून तुर्किए सावरत असताना आता काही आठवड्यांनंतर पुन्हा शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. सहा दिवसांपूर्वी 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप झाला होता. या भूकंपात 200 हून अधिक जखमी आणि तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते.
दरम्यान, काही आठवडे आधी आलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर सरकारकडून मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे. भूकंपामुळे बेघर झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. उद्धवस्त झालेली घरे बांधण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून शुक्रवारी देण्यात आली होती.
तुर्किएमध्ये 6 फेब्रुवारी रोजी आलेल्या भूकंपामुळे 1 लाख 60 हजाराहून अधिक इमारतीमधील सुमारे 5 लाख 20 हजारे घरे उद्धवस्त झाली आहेत. या भूकंपात हजारो नागरीक मृत्यूमुखी पडले असून लाखो लोक निर्वासित झाले आहेत.
आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने (AFAD) दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीपर्यंत भूकंपामुळे तुर्किएतील मृतांची संख्या 44,218 वर पोहोचली होती. यामध्ये सीरियातील 5,914 ही मृतांची संख्या मोजल्यास एकत्रित मृत्यूची संख्या 50,000 च्या वर गेली आहे.
तुर्किए सरकारच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रकल्प, बांधकामांशी निगडित प्रकल्पांची निविदा काढण्यात आली आहे. या सगळ्या प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात येणार आहे. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे माहिती तुर्किए सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.
वृत्तांनुसार, तुर्किए सरकारकडून दोन लाख घरे बांधण्यात येणार असून ग्रामीण भागातील 70 हजार घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी 15 अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित आहे. भूकंपामुळे जवळपास 1.5 दशलक्ष नागरीक बेघर झाली आहेत. त्यांच्यासाठी पाच लाख घरांची आवश्यकता आहे.
भारतासह इतर 84 देशांच्या पथकांकडून बचावकार्य सुरू
6 फेब्रुवारी रोजी तुर्कीए आणि सीरियामध्ये मोठा भूकंप आला. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक आफ्टर शॉक बसले. भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी भारताने NDRF पथकाला तुर्कीमध्ये पाठवलं. भारतासह इतर 84 देशांच्या बचाव पथकांकडून तुर्की आणि सीरियामध्ये बचावकार्य सुरू आहे.