(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TCS Jobs: टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारवाढीसोबतच नोकर भरतीची देखील घोषणा
TCS Jobs: टीसीएसने कर्मचाऱ्यांच्या दुप्पट पगारवाढीसोबतच 44,000 नोकर भरती करणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसमध्येदेखील 100 टक्के वाढ होणार आहे.
TCS Jobs : सध्या सुरु असलेल्या जागतिक मंदीचा (Recession) आर्थिक तोटा बऱ्याच कंपन्यांना होत आहे. परिणामी बऱ्याच कंपन्यांनमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे. पण हे सगळं सुरु असताना टीसीएसने मात्र एक सकारात्मक पाऊल उचललं आहे. टीसीएस आता नवीन लोकांना कामाची संधी देत आहेच पण त्याचबरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार देखील वाढवत आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आपल्या कर्मचार्यांमध्ये पगारातील असमानता दूर करण्यासाठी ही पगारवाढ करत असल्याचं सांगत आहे. TCS चे ह्युमन रिसोर्ससेचे प्रमुख मिलिंद लक्कड यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "प्रत्येक व्यवसाय हा आपल्या कर्मचार्यांना त्यांच्यातील गुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहित करत असतो."
टीसीएसचे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन
टीसीएसचे जगभरात जवळपास 60,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. टीसीएस सतत त्यांच्या कर्मचाऱ्यांचा विचार करत त्यांच्यातील गुणांना वाव देण्याचे काम करत असते. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांचा विचार करता त्यांच्या कामानुसार त्यांना पगारवाढ देखील दिली जाते. टीसीएसचे कायम असे म्हणणे असते की, "जास्त पगार देऊन नवीन लोकांना बोलवण्यापेक्षा आहे त्या लोकांचा पगार वाढवणे जास्त सोयीस्कर ठरते." कोरोनामधून सावरण्यासाठी अशी धोरणे कंपनीसाठी फायदेशीर ठरतात, असे देखील टीसीएसकडून सांगण्यात येत आहे.
TCS CHRO (Cheif Human Resource) प्रमुख मिलिंद लक्कड यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "कंपनीतील पगारात असलेली तफावत कमी करण्यासाठी काही नव्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे."
टीसीएसच्या नव्या धोरणांमध्ये खालील बाबींचा समावेश असल्याचं लक्कड यांनी सांगितले आहे.
- सर्वात आधी टीसीएस आपल्या आधीच्या कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट करणार आहे. जे कर्मचारी त्यांना देण्यात आलेले कार्य लवकर आणि व्यवस्थित पार पाडतील त्यांची पगारवाढ सर्वात आधी होईल.
- लक्कड पुढे म्हणाले की, "कंपनी नवीन कामासाठी सुरुवातीचे वेतन वाढवण्याचा आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना, विशेषत: खालच्या स्तरावरील पदांवर असलेल्यांना पगांरात 12 ते 15 टक्क्यांची वाढ करणार आहे."
- आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बोलवणार असल्याचंही लक्कड यांनी सांगितलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वाढीसाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मदत होईल.
- नवीन लोकांना वाव देण्यापेक्षा कंपनीत असलेल्या लोकांना संधी देऊन त्यांना उत्तेजन देण्यास कंपनीचा भर असणार आहे.
- तसेच नवीन तरुणांना नोकरीची संधी निर्माण करुन देण्यासाठी टीसीएसने 44,000 नोकर भरतीची घोषणा केली आहे.
टीसीएसच्या या धोरणांमुळे सध्या सुरु असलेल्या कर्मचारी कपातीचं प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत करेल. तसेच नवीन तरुणांना नोकरीची नवी दालनं देखील खुली होतील.