Mahinda Rajapaksa Resigns: अखेर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा, अनेक दिवसांपासून सुरू होती निदर्शनं
Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि निदर्शने दरम्यान पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील आर्थिक संकट आणि निदर्शने दरम्यान पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यापूर्वी त्यांनी ट्विट केले की, "मी सामान्य जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन करतो आणि लक्षात ठेवा की, हिंसेने फक्त हिंसाचार वाढेल. आर्थिक संकटातून आपल्याला समाधानाची गरज आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध आहे.
राजपक्षे यांचा राजीनामा देशात हिंसाचाराच्या घटनांदरम्यान देण्यात आला आहे, ज्यामध्ये किमान 16 लोक जखमी झाले आहेत. महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ जमलेल्या सरकारविरोधी निदर्शनं करणाऱ्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी शहरात कर्फ्यू लागू केला. महिंदा राजपक्षे (76) यांच्यावर त्यांच्याच श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) पक्षाच्या नेत्यांकडून राजीनामा देण्यासाठी दबाव होता. या दबावाविरुद्ध ते पाठिंबा गोळा करत होते. मात्र अखेर त्यांना आता राजीनामा द्यावा लागला आहे.
महिंदा यांचे धाकटे बंधू आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री देशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली. राजपक्षे यांनी 1 एप्रिल रोजी त्यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू असताना आणीबाणीची घोषणा केली होती. मात्र 5 एप्रिल रोजी ही आणीबाणी मागे घेण्यात आली आहे.
दरम्यान, श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात परदेशी चलनाची कमतरता आहे. अशातच मोठ्या प्रमाणात आयातीवर निर्भर असलेल्या श्रीलंकेला बाहेरून जीवनावश्यक वस्तू मागवण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच देशात परदेशी चलनाची कमतरता असल्याने इतर देशातून इंधन खरेदी करणंही कठीण झालं आहे. ज्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे. तसेच महागाईचाही जोर वाढला आहे. ज्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :