Sri Lanka Gold Rate : सोन्याच्या लंकेत खऱ्याखुऱ्या सोन्याचा भाव चक्रावून सोडणारा, एक तोळा सोनं तब्बल...
आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत अन्न-धान्याला सोन्याची किंमत, सोन्याच्या लंकेत खऱ्याखुऱ्या सोन्याचा भाव चक्रावून सोडणारा, श्रीलंकेतील हेट्टीवेदी गोल्ड मार्केटमध्ये तोळ्याचा भाव 2 लाख 37 हजारांवर
Sri Lanka Economic Crisis : कोलंबो : सोन्याची लंका असा लौकिक असलेल्या श्रीलंकेत अन्न-धान्याला सोन्याची किंमत आली आहे. मग खऱ्याखुऱ्या सोन्याची काय अवस्था आहे हे बाजारात सोन्याच्या पेठेत फेरफटका मारल्यावर समजतं. अगदी महिन्याभरापूर्वी सगळं ठीकठाक चाललं असताना अचानकपणे चलनाचं अवमूल्यन झालं आणि सगळ्या वस्तूंचे दर गगनाला भिडले. त्यामुळे सोन्याची खरेदीही 70 टक्के घटली आणि दर तब्बल एका तोळ्याला 2 लाख 37 हजार रुपयांवर गेला आहे.
एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिजीत करंडे श्रीलंकेतील हेट्टीवेदी गोल्ड मार्केटमध्ये पोहोचून तिथला आढावा घेतला. एरवी तुफान गर्दी असलेल्या या मार्केटमध्ये सोमवारी (11 एप्रिल) शांतता होती. दुकानात एखादा दुसरा ग्राहक सोडता कुणीही नव्हतं. दुकानातील सेल्समन अक्षरशः दाराकडे डोळे लावून बसले होते.
सोनं विकून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी
डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या श्रीलंकेतील लोकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यपदार्थांसह अनेक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोक दागिने विकून पैसे उभे करत आहेत, अशी स्थिती आहे. दैनंदिन वापराच्या वस्तू घेण्यासाठीही लोकांना सोन्याचे दागिने विकावे लागत असल्याचं इथल्या सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलं. "इथल्या लोकांकडे खाण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे ते सोने विकत आहेत. आपलं सोनं गहाण ठेवण्याची परिस्थिती लोकांवर यापूर्वी कधीही आली नव्हती.
श्रीलंकन रुपया निचांकी स्तरावर
श्रीलंकेची अर्थव्यवस्था स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. श्रीलंकेवर चीन, जपान, भारत आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांचं मोठं कर्ज आहे. पण परकीय चलनाच्या साठ्याच्या कमतरतेमुळे ते कर्जाचा हफ्तही भरु शकत नाही. त्याचवेळी, श्रीलंकन रुपया हे सर्वात कमकुवत कामगिरी करणारं चलन बनलं आहे. शनिवारी (9 एप्रिल) श्रीलंकन रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 315 च्या स्तरावर पोहोचला होता, जो निचांकी आहे.
संबंधित बातम्या