Sri Lanka Economic Crisis : राज्यकर्त्यांनी ओरबाडणाऱ्या चीनपेक्षा अडचणीत धावून येणाऱ्या भारताची कदर करावी : अर्जुन रणतुंगा
चीनपेक्षा राज्यकर्त्यांनी भारतासारख्या अडचणीत धावून येणाऱ्या मित्रांची अधिक कदर करायला हवी, असं माजी क्रिकेटपटू आणि माजी मंत्री अर्जुन रणतुंगा यांनी म्हटलं आहे.
कोलंबो : श्रीलंका अडचणीत असताना चारही बाजूंनी लंकेला घेरण्याचा आणि ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनपेक्षा राज्यकर्त्यांनी भारतासारख्या अडचणीत धावून येणाऱ्या मित्रांची अधिक कदर करायला हवी, असं माजी क्रिकेटपटू आणि माजी मंत्री अर्जुन रणतुंगा यांनी म्हटलं आहे. ते जा एला इथे एबीपी माझासोबत बोलत होते. चीनच्या घुसखोरीवर अर्जुन रणतुंगा यांनी कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.
देशात मिलिट्री शासन यावं किंवा रक्तपात व्हावा अशी आमची इच्छा नाही त्यामुळे राजपक्षे यांनी सत्तेतून पायउतार व्हावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सत्तेचा गैरवापर करुन देशाला अडचणीत आणणारी खिसेभरु धोरणं राबवल्यामुळेच आज लंकेत दूध, अन्नधान्यासह गॅस आणि पेट्रोल-डिझेलसाठी लोकांना रांगा लावाव्या लागत असल्याचं रणतुंगा यांनी म्हटलं आहे. तसंच देशातील क्रिकेटर्स, ॲक्टर्स, सिव्हिल सोसायटीतील लोकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रस्त्यावर उतरुन आंदोलकांना पाठिंबा द्यावा असं आवाहनही रणतुंगा यांनी केलं आहे.
भारताने केलेल्या मदतीवरुन याआधी अर्जुन रणतुंगा यांनी देशासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं होतं. रणतुंगा म्हणाले होते की, "जाफना आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करण्यासाठी अनुदान देण्यात पंतप्रधान मोदी खूप उदार होते. भारत हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांनी आमच्या पेट्रोल आणि औषधांसारख्या गरजा पूर्ण केल्या. आम्हाला खूप मदत केली आहे.
यापूर्वी श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने, कुमार संगकारा, सनथ जयसूर्या याच्याशिवाय भानुका राजपक्षे, दशून या श्रीलंकेच्या सध्याच्या क्रिकेटपटूंनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते.
भारताचा शेजारी देश श्रीलंका अतिशय गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि औषधांसह दैनंदिन वापराच्या सर्व वस्तूंचा तुटवडा आहे. यासोबतच तेथे राजकीय पेच सुरु आहे. मात्र, एवढ्या विरोधानंतरही राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे राजीनामा देण्यास तयार नाहीत, तर विरोधक त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. या कठीण परिस्थितीत भारताने श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला आहे.
संबंधित बातम्या