श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आणखी एक बॉम्बस्फोट, राष्ट्रपतींकडून आणीबाणी जाहीर
रविवारी श्रीलंकेत आठ विविध ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये एकूण 290 जणांचा मृत्यू झाला, तर 500 हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये आठ भारतीय नागरिकांचा समावेश आहे.
कोलंबो : आठ साखळी बॉम्ब स्फोटांनी हादरलेल्या श्रीलंकेतील कोलंबो शहरात आज आणखी एक बॉम्बस्फोट झाला. एका चर्च शेजारील बॉम्ब निकामी करताना हा बॉम्बस्फोट झाला. सुदैवांने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय शोधमोहिमेत पोलिसांना एका बस स्टॉपवर 87 बॉम्ब डेटोनेटरही मिळाले आहेत.
या संपूर्ण घटनेनंतर श्रीलंकेच्या राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांना देशात आणीबाणी जाहीर केली आहे. राष्ट्रपती सिरिसेना यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली, त्या बैठकीत आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीलंकेत मंगळवारी शोक दिवस जाहीर करण्यात आला आहे.
रविवारी कोलंबोतील आठ विविध ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. यामध्ये एकूण 290 जणांचा मृत्यू झाला, तर 500 हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये आठ भारतीय नागरिकांचा समावेश आहे.
Reuters: An explosion went off in a van near a church in Colombo, #SriLanka when bomb squad officials were trying to defuse it. pic.twitter.com/eBpIUKk7Pt— ANI (@ANI) April 22, 2019
रविवारी ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना कोलंबो येथील सेंट अँटनी चर्चमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर दुसरा स्फोट कोलंबो शहराच्या बाहेर नेगोम्बो परिसरातील सेबेस्टियन चर्चमध्ये, तिसरा स्फोट पूर्वेकडील बाट्टिकालोआ चर्चमध्ये झाला. ज्या हॉटेलांमध्ये स्फोट झाले त्यात शांगरीला, द सिनामॉन ग्रँड आणि द किग्सबरी यांचा समावेश आहे.
या बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 24 जणांना अटक केली आहे. मात्र अद्याप कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. यामागे नॅशनल तौहिद जमातचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्रीलंकेच्या एका मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेने 11 एप्रिलच्या आधी मोठ्या हल्ल्याची शक्यता वर्तवली होती, तसेच पोलिसांना याबाबत सतर्क केलं होतं.
संबंधित बातम्या
श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात 35 परदेशी नागरिक मृत, सर्व भारतीय सुरक्षित, मृतांचा आकडा 207 पार
श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी