पाकिस्तानमध्ये होणार SCOचा सराव; भारतीय लष्कराच्या सहभागावर प्रश्नचिन्हं
शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (एससीओ) मध्ये भारत, पाकिस्तान, चीन, रशिया, कझाकिस्तान, उज्बेकिस्तान, किग्रिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांचा सहभाग आहे.
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (एससीओ) या सैन्य सराव शिबिराचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी या शिबीरवजा उपक्रमाचं नाव 'पब्बी-अँटी टेरर 2021' असं ठेवण्यात आलं असून, पाकिस्तानातील पब्बी भागात हे शिबीर होणार आहे. जे खैबर पख्तूनख्वा प्रांतात येतं. त्याच भागात ऐबटाबाद आणि बालाकोटचाही समावेश आहे. भारतीय सैन्याचा यामध्ये सहभाग असणार की नाही, हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (एससीओ) मध्ये भारत, पाकिस्तान, चीन, रशिया, कझाकिस्तान, उज्बेकिस्तान, किग्रिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांचा सहभाग आहे. रशियाच्या नेतृत्त्वाखाली दरवर्षी या सर्व देशांची लष्करं युद्धाभ्यासामध्ये सहभागी होतात. आतापर्यंत याचं आयोजन रशियातच केलं जात होतं.
भारतीय लष्करानं 2018 मध्ये पहिल्यांदाच या युद्धाभ्यासात सहभाग घेतला होता. त्यावेळी हे शिबीर रशियातील चेबरकुल सैन्य तळावर पार पडलं होतं. 1947 च्या फाळणीनंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्र अनेक वर्षांनी चेबरकुल इथं झालेल्या युद्धाभ्यासात सहभागी झाली होती.
पाकिस्तानमध्ये यंदाच्या वर्षी होणाऱ्या युद्धाभ्यासाचीच सध्या संरक्षण खात्यांमध्ये चर्चा सुरु आहे. दहशतवाद्यांची सक्रीय तळं आणि तिथं सुरु असणाऱ्या हालचाली पाहता युद्धाभ्यासावर सर्वांचं लक्ष आहे. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलानं जैश-ए-मोहम्मट या दहशतवादी संघटनेचे खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तळ उध्वस्त केले. त्याच प्रांतात आता हा युद्धाभ्यास होणार असल्याचं म्हटलं जात आहे.