(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russian Missile Strike : युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियाचा हल्ला, मिसाईल हल्ल्यात 22 नागरिकांचा मृत्यू
Russian Ukraine Crisis : युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियाने युक्रेनवर मिसाईल अटॅक केला. रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 22 नागरिक ठार झाले आहेत.
Russian Ukraine War : युक्रेनने 24 ऑगस्ट रोजी 31 वा स्वातंत्र्यदिन (Ukraine's Independence Day) साजरा केला. यावेळी जगभरातून युक्रेनवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र या आनंदावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला करत विरजण लावलं. युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियाने युक्रेनवर मिसाईल अटॅक केला. रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 22 नागरिक ठार झाले आणि पूर्व युक्रेनमध्ये एका प्रवासी ट्रेनला आग लागली, असं कीव्हमधील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या हल्ल्याच्या आदल्या दिवशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियाकडून हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी रशियाने रेल्वे स्थानकावर हल्ला केला यामध्ये 22 जण मारले गेले आहेत.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन युक्रेन दौऱ्यावर
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त युक्रेनचा दौरा केला. बोरिस जॉन्सन यांनी कीव्हला भेट दिली आहे. युद्ध सुरू झाल्यापासून जॉन्सन यांचा युक्रेनचा हा तिसरा दौरा आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक देशांनी शुभेच्छा दिल्या. तसेच युरोपीय देशांच्या नेत्यांनी युक्रेनच्या नागरिकांच्या त्याग आणि धैर्याला सलाम करत शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आणि युक्रेनवरील हल्ल्याबद्दल रशियाचा निषेध केला. अमेरिकेने येत्या काही वर्षात युक्रेनला लष्करी लढाईला मदत करण्यासाठी सुमारे तीन अब्ज डॉलरचे मोठं लष्करी मदत पॅकेज जाहीर केलं आहे.
युक्रेनच्या नऊ हजारहून अधिक सैनिकांचा मृत्यू
रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे नऊ हजारहून अधिक सैनिक मारले गेले आहेत. तर संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत पाच हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती देताना युक्रेनचे लष्कर प्रमुख जनरल व्हॅलेरी झालुझनी यांनी सांगितलं आहे की, अद्याप रशिया-युक्रेनमधील युद्ध संपण्याची चिन्हं दिसत नाहीय. जनरल व्हॅलेरी झालुझनी यांनी एका कार्यक्रमात सांगितले , युक्रेनमधील अनेक मुलांच्या डोक्यावर छत्र हरपलं आहे. त्यांनी काळजी घेण्याची गरज आवश्यक आहे. तर सुमारे 9,000 सैनिकांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलं निराधार झाली आहेत. अनेक मुलांनी त्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत.
युक्रेनमधील 972 लहान मुलांचा मृत्यू
युनिसेफ म्हणजेच संयुक्त राष्ट्रांचा बाल निधीकडून मिळालेल्या माहितीनुसार, युद्धामध्ये युक्रेनमधील सुमारे 972 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. युनिसेफच्या कार्यकारी संचालक कॅथरीन रसेल यांन सांगितलं की लहान मुलांच्या मृत्यूचा हा आकडा संयुक्त राष्ट्राच्या माहितीच्या आधारे आहे. मात्र खरा आकडा याहून अधिक असण्याची शक्यता आहे.