Russia Ukraine War : युद्ध थांबवायचे आहे? तर, 'या' चार अटी मान्य करा; रशियाचा युक्रेनवर दबाव
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी चार अटी ठेवल्या आहेत. युक्रेनच्या माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 13 दिवस झाले आहेत. युक्रेनकडून रशियन फौजांचा प्रतिकार सुरू आहे. तर, दुसरीकडे रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याने युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवरून रशियावर दबाव आणला जात आहे. दरम्यान, रशियाने युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यांनी युक्रेनसमोर चार अटी ठेवल्या आहेत.
युक्रेनमधील माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. या अटी मान्य केल्यास त्वरीत युद्ध थांबवण्याची तयारी रशियाने दाखवली असल्याचे युक्रेनच्या माध्यमांनी म्हटले आहे.
>> रशियाच्या नेमक्या अटी कोणत्या?
सैन्य कारवाई बंद करा
युक्रेनवर हल्ला करताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन बळकावण्याचा इरादा नसल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या मदतीने सुरू असलेले युक्रेनचे सुरू असलेले लष्करीकरण थांबण्यासाठी रशियाने युद्ध सुरू केले असल्याचे म्हटले जात आहे. युक्रेनने अधिक प्रमाणावर लष्करीकरण करणं बंद करावे अशी अट घातली आहे.
संविधानात बदल करा
रशियाच्या विरोधानंतरही युक्रेन नाटोमध्ये सहभागी होत आहे. अमेरिका आणि नाटोकडूनदेखील असेच प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनने तटस्थ राहावे यासाठी आपल्या संविधानात बदल करावेत अशी अट रशियाने घातली आहे. संविधानात बदल केल्यास नाटो आणि युरोपीयन युनियनसारख्या संघटनेत सहभागी होणे अडचणीचे ठरणार आहे.
क्रीमियाला मान्यता द्या
युक्रेनला क्रीमियाला रशियाचा भूभाग म्हणून मान्यता द्यावी असेही रशियाने म्हटले आहे. कधीकाळी क्रीमिया हा रशियाचा भूभाग होता. सोव्हिएत महासंघाचे नेते निकिता ख्रुश्चेव यांनी 1954 म्हणून हा प्रांत युक्रेनला भेट म्हणून दिला होता. त्यानंतर 2014 मध्ये रशियाने हल्ला करून क्रीमियाला ताब्यात घेतले. मात्र, युक्रेनने अद्यापही याला अधिकृत मान्यता दिली नाही. क्रीमियाच्या भूभागाला मान्यता दिल्यास युद्ध बंद होईल असे रशियाने म्हटले आहे.
डोनेत्स्क-लुहांस्कला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या
सन 2014 मध्ये पूर्व युक्रेनमधील डोन्बास प्रांतातील डोनेत्स्क आणि लुहांस्क मध्ये फुटीरतावाद्यांनी स्वतंत्र देश म्हणून घोषित केले होते. युक्रेनसोबत युद्ध सुरू करण्याआधीदेखील रशियाने या प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले होते. युक्रेननेदेखील या प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी रशियाने केली आहे.