(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : युक्रेनच्या मदतीला अमेरिकेचं सैन्य जाणार? बायडन म्हणाले...
Russia Ukraine Conflict : Ukraine ला आता स्वबळावरच लढावं लागणार युद्ध; सैन्य पाठवणार नाही, असा निर्णय जो बायडन यांनी घेतला आहे. तर नाटो देशांनीही युक्रेनची साथ सोडल्याचं दिसत आहे.
Russia Ukraine War : रशिया (Russia) आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. अशातच आतापर्यंत युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अमेरिकेनं मात्र आता हात वर केले आहेत. युक्रेनमध्ये (Ukraine) सैन्य पाठवणार नसल्याचा मोठा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. अशातच नाटो देशांनीही युक्रेनकडे पाठ फिरवली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे बलाढ्य रशियापुढे युक्रेनचा एकाकी लढा सुरु आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच या युद्धात युक्रेन एकटा पडलाय का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
रशियानं युक्रेनमध्ये लष्कर घुसवल्यानंतर अमेरिका आणि अन्य नाटो (NATO) देश त्यांना मदत करतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र सध्या तरी युक्रेनचा एकाकी लढा सुरू असल्याचं दिसत आहे. नाटो देशांनी अद्याप युक्रेनमध्ये सैन्य पाठवलं नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनीही अद्याप युक्रेनमध्ये सैन्य तैनात करण्याबाबत नकार दिला आहे. परंतु, रशियाला जे मदत करतील त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही बायडन यांनी दिला आहे.
युक्रेनमध्ये यूएस सैन्य नाही पण... : जो बायडन (Joe Biden)
युक्रेनमध्ये आपलं सैन्य पाठवणार नसल्याचं बायडन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. दरम्यान, बायडन म्हणाले की, युक्रेनमध्ये यूएस सैन्य नाही पण 'नाटो (NATO) प्रदेशाच्या प्रत्येक इंचाच्या जमिनीचं रक्षण करण्यास अमेरीका कटिबद्ध आहे. एवढंच नाही तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचंही बायडन यांनी सांगितलं.
अमेरिकेकडून रशियावर कठोर निर्बंध
बायडन यांनी रशियावर कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाहीतर अमेरिकेकडून रशियावर निर्यात निर्बंधही लादण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, या निर्बंधांचा मोठा फटका रशियाला बसेल, असंही बायडन म्हणाले. सोबतच रशियातील उद्योगपती आणि अब्जाधीशांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आर्थिक कोंडी करणार असल्याचा सूचक इशाराही जो बायडन यांनी दिला आहे. त्यासोबतच बायडन यांनी तेलाचे भाव कमी करण्यासाठी अमेरीकेतील तेलाच्या राखीव बफरमधून तेल बाजारात देण्याचं सांगितलं आहे. रशियाला स्विफ्ट बँकिंग प्रणालीपासून वेगळं केलं. रशियाच्या आर्थिक नाड्या आवळल्या, या निर्णयामुळे काही दिवसांत रशियात परदेशी चलनाचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले. लढाईत 137 युक्रेनी नागरिक आणि सैनिक मारले गेले आहेत. तर रशियाचे 50 सैनिक ठार झाल्याचा दावा युक्रेननं केला आहे. रशियाचं सैन्य आता युक्रेनची राजधानी कीवच्या जवळ पोहचलं आहे. हल्ल्यात लष्करी आणि हवाई तळ लक्ष्य करण्यात आलं. बॉम्बहल्ल्यात युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. युक्रेनमध्ये 1 लाखांवर लोक बेघर झाले आहेत. चेर्नोबिल अणु प्रकल्पावरही रशियानं ताबा घेतल्याचं वृत्त आहे. अमेरिका आणि मित्र राष्ट्रं रशियावर निर्बंध घालून इशारा देत असले तरी त्यांनी अद्याप युक्रेनमध्ये सैन्य पाठवलेलं नाही. नाटो देशांचं सैन्य युद्धात सहभाग घेणार नाही, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे युक्रेन एकाकी पडल्याचं चित्रं आहे. त्यातच रशियाचं सैन्य कीवजवळ पोहोचल्यानं पुढे काय होणार याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : जो बायडन यांचा संताप; रशियाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय
- Russia Ukraine War : रशियन फौजांचा चेर्नोबिल अणू प्रकल्पावर ताबा; जगाच्या चिंतेत भर
- Russia Ukraine War : हंगेरीसह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणार
- Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन वादावर केवळ संवादातून मार्ग निघेल; पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदींचे आवाहन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha