Rishi Sunak New UK PM: ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, पेनी मॉर्डंट यांची माघार
Rishi Sunak New UK PM: ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान, पेनी मॉर्डंट यांची माघार
Rishi Sunak New UK PM: भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे. ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डोंटचा पराभव करून विजय मिळवला आहे. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ 185 हून अधिक खासदार आहेत. तर पेनी मॉर्डंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात आणि 29 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते.
Britain's Conservative Party leader #RishiSunak becomes the Prime Minister of the United Kingdom. pic.twitter.com/nC39dzX7gd
— ANI (@ANI) October 24, 2022
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे नाव देखील होते. मात्र त्यांनी आपले नाव मागे घेतल्याने सोमवारी ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व हाती घेण्याची शक्यता अधिक वाढली. बोरिस जॉन्सन यांनी रविवारी रात्री पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती.
तत्पूर्वी आपली उमेदवारी जाहीर करताना ऋषी सुनक म्हणाले होते की, त्यांना देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करायची आहे, पक्षाला एकत्र करायचे आहे आणि देशासाठी काम करायचे आहे. यापूर्वी सोमवारी, माजी गृहमंत्री प्रिती पटेल, कॅबिनेट मंत्री जेम्स क्लेवर्ली आणि नदीम जाहवी यांच्यासह अनेक प्रमुख कंझर्व्हेटिव्ह खासदारांनी सुनकच्या समर्थनार्थ जॉन्सन यांच्या गटातून बाहेर पडले. प्रिती पटेल या भारतीय वंशाच्या माजी ब्रिटीश मंत्री आहेत. ज्यांनी मागील महिन्यात लिझ ट्रस पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने सुनक यांना नेतृत्वाची संधी द्यावी, असं त्या म्हणाल्या होत्या.
कोण आहेत ऋषी सुनक?
ऋषी सुनक यांचे आई-वडील मूळचे भारतीय आहेत. त्यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथम्प्टन, इंग्लंड येथे झाला. त्यांच्या भारतीय कनेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, ऋषी सुनक यांचे आजी-आजोबा भारतातून आफ्रिकेत स्थायिक झाले होते. त्यानंतर त्यांचे वडील आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. ऋषी सुनक यांचे आजोबा पंजाबमधून टांझानियाला गेले. यानंतर त्यांच्या आईचे कुटुंब टांझानियाहून ब्रिटनमध्ये गेले. त्यांच्या आई-वडिलांनी ब्रिटनमध्येच लग्न केले. ऋषी सुनक हे 42 वर्षांचे असून त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीसोबत लग्न केले आहे. ऋषी सुनक हे पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ब्रिटनचे ते सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत आणि त्यांची संपत्ती 7300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.