शेअर करायची होती कोरोनाची आकडेवारी, पोस्ट केली अडल्ट व्हिडीओची लिंक, कॅनडातील क्युबेक आरोग्य विभाग ट्रोल
कॅनडातील क्युबेकच्या आरोग्य आणि सामाजिक सेवा मंत्रालयाने चुकून कोविड-19 डेटा असलेल्या सरकारी साईटऐवजी पॉर्नहब साईटच्या व्हिडीओची लिंक ट्विट केली. यानंतर एजन्सीने दिलगिरी व्यक्त केली.
मुंबई : करायला गेले एक, झालं भलतंच...असंच काहीसं घडलं कॅनडामधील आरोग्य एजन्सीच्या बाबतीत. एजन्सीने कोरोना व्हायरसवरील ताज्या आकडेवारीची माहिती अपलोड करणं अपेक्षित होतं, परंतु या एजन्सीने चुकून अडल्ट व्हिडीओची लिंक शेअर केली. क्युबेकच्या आरोग्य आणि सामाजिक सेवा मंत्रालयाने चुकून कोविड-19 डेटा असलेल्या सरकारी साईटऐवजी पॉर्नहब साईटच्या व्हिडीओची लिंक ट्विट केली. यानंतर एजन्सीने दिलगिरी व्यक्त केली.
ही घोडचूक ट्विटर अकाऊंटवरुन घडली, त्यानंतर सोशल मीडियावरील यूजर्सनी क्यूबेकच्या आरोग्य मंत्रालयाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. क्यूबेक हा कॅनडामधील प्रांत आहे. कोणीतरी क्यूबेक आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केलं. हे ट्वीट 14 एप्रिल रोजी करण्यात आलं होते, जे जवळपास 30 मिनिटं सोशल मीडियावर उपस्थित होता.
ही चूक लक्षात आल्यानंतर ट्वीट डिलीट करण्यात आले. नंतर, दुसर्या ट्विटमध्ये या विभागाने आपल्या फॉलोअर्सची माफी मागितली आहे. ट्विटरवर त्यांचे 1 लाख 30 हजार फॉलोअर्स आहेत. ही आरोग्य संस्था Santé Québec म्हणूनही ओळखली जाते.
विभागाकडून माफी
माफी मागताना विभागाने लिहिले की, "आमच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे ट्विटर अकाऊंटवरुन अयोग्य सामग्री असलेली लिंक पोस्ट करण्यात आली. आम्ही कारणे शोधत आहोत. गैरसोयीबद्दल क्षमस्व."
En raison d’une situation hors de notre contrôle, un lien avec du contenu inapproprié a été publié sur notre compte Twitter. Nous en cherchons les causes. Nous sommes désolés des inconvénients.
— Santé Québec (@sante_qc) April 14, 2022
मात्र, माफी मागितल्यानंतरही सोशल मीडियावरील युजर्सनी विभागाला ट्रोल करणं सुरुच ठेवलं. एका युझरने लिहिले की, "मला Santé Québec च्या कर्मचाऱ्याबद्दल सहानुभूती आहे, ज्याने चुकून अधिकृत ट्विटर खात्यावर या व्हिडीओची लिंक शेअर केली."
नंतर हेल्थ क्यूबेकने ट्विटर अकाऊंटवर कोविडच्या अचूक आकडेवारीचा डेटा शेअर केला. पण युजर्स त्यानंतरही आधीच्या त्या ट्वीटचे अनेक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करत होते.