प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल ब्रिटनच्या राजघराण्याचं शाही पद सोडणार!
प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचा शाही विवाहसोहळा मे 2018 मध्ये पार पडला होता. यानंतर त्यांना द ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स हा किताब देण्यात आला. तर 6 मे 201 रोजी त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला. त्याचं नाव आर्ची हॅरिसन माऊंटबॅटन विंडसर आहे.
![प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल ब्रिटनच्या राजघराण्याचं शाही पद सोडणार! Prince Harry and Meghan Markel to step back as senior members of royal family प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल ब्रिटनच्या राजघराण्याचं शाही पद सोडणार!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/09090306/Harry_Meghan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लंडन : इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांचे नातू प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांनी राजघराण्याचं 'वरिष्ठ' सदस्यपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी इन्स्टाग्रामवर संयुक्त परिपत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, "आम्ही आमच्या राजघराण्याचं वरिष्ठ पद सोडत असून आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी काम करणार आहोत." हॅरी आणि मेगन यांनी सांगितलं की, दोघे चॅरिटी सुरु करुन आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या दिशेने काम करणार आहे.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचा शाही विवाहसोहळा मे 2018 मध्ये पार पडला होता. यानंतर त्यांना द ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स हा किताब देण्यात आला. तर 6 मे 201 रोजी त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला. त्याचं नाव आर्ची हॅरिसन माऊंटबॅटन विंडसर आहे.
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्या संयुक्त पत्रकात लिहिलं आहे की, "अनेक महिन्यांच्या चिंतन आणि अंतर्गत चर्चेनंतर प्रगतशील नवी भूमिका साकारण्यासाठी आम्हाला बदल करायचा आहे. शाही कुटुंबाचं वरिष्ठ सदस्य पद सोडण्याचा आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा आमचा मानस आहे. हे करत असताना आमचा महाराणीला संपूर्ण पाठिंबा असेल. आपल्या प्रोत्साहनामुळेच, विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये, आम्ही हे पाऊल उचलण्यास तयार आहोत असं वाटतं. महाराणी एलिझाबेथ, राष्ट्रकुल आणि सहाय्यकांप्रती आमचं कर्तव्य कायम ठेवून आता युनायटेड किंग्डम आणि उत्तर अमेरिकेत वेळ व्यतीत करण्याचा आमचा विचार आहे."
हॅरी आणि मेगन याच महिन्यात सहा आठवड्यांच्या सुट्टीनंतर कॅनडाहून परतले होते. त्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतल्याची अटकळ बांधली जात आहे.
सध्या प्रिन्स हॅरी हे राजघराण्यातील सहावे वारसदार आहेत. प्रिन्स हॅरी हे प्रिन्स चार्ल्स यांचे दुसरे सुपुत्र, म्हणजेच प्रिन्स विल्यम्स यांचे धाकटे बंधू. त्यांच्यानंतर हॅरी आणि मेगन यांचा पुत्र आर्ची सातव्या क्रमांकाचा वारसदार ठरतो. दरम्यान, मोठा भाऊ प्रिन्स विल्यमसोबत मतभेद असल्याची बाब प्रिन्स हॅरीने स्वीकारल्याची चर्चा होती.
संबंधित बातम्या
रॉयल बेबीच्या जन्माने ब्रिटनच्या राजघराण्यात वारसदारांचा क्रम बदलला
ब्रिटनच्या राजघराण्यात नवा पाहुणा, प्रिन्स हॅरी-मेगन मार्कल यांच्या 'रॉयल बेबी'चं आगमन
ब्रिटन राजघराण्याच्या नव्या राजपुत्रासाठी मुंबईच्या डबेवाल्यांकडून दागिन्यांची खरेदी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)