Petrol Price in Sri Lanka : श्रीलंकेत पेट्रोल एका झटक्यात 40 रुपयांनी स्वस्त; आर्थिक संकटात जनतेला दिलासा
Petrol-Diesel Price in Sri Lanka : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत एका झटक्यात 40 रुपयांनी पेट्रोल स्वस्त झालं आहे.
Petrol-Diesel Price in Sri Lanka : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या भारताचा शेजारील देश श्रीलंकेत (Sri Lanka) पेट्रोलच्या दरांत (Petrol Price in Sri lanka) दिलासा मिळाला आहे. महागाईचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत पेट्रोल 40 रुपयांनी स्वस्त झालं आहे. डिझेलचे दर मात्र जैसे थेच आहेत. डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
श्रीलंका सरकारनं शनिवारी पेट्रोलच्या (Petrol Price) दरांत प्रतिलिटर 40 रुपयांची कपात केली. त्यामुळे देशात पहिल्यांदाच डिझेलचे दर पेट्रोलच्या किमती अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीलंकेत आता पेट्रोलपेक्षा डिझेल महागलं आहे.
श्रीलंकेच्या ऊर्जा मंत्री कांचन विजयशेखर यांनी शनिवारी, 01 ऑक्टोबर रोजी पेट्रोलच्या किमतींत कपात करण्याची घोषणा केली आणि सांगितलं की, पेट्रोलचे नवे दर आता 410 श्रीलंकन रुपये प्रति लिटर असेल. पेट्रोलच्या किमतीत कपात करण्यापूर्वी पेट्रोल 450 रुपये प्रति लिटरनं विकलं जात होतं. सरकारच्या या निर्णयानंतर लंका इंडियन ऑईल कॉर्पोरेशननंही सरकारी किंमतीच्या पातळीनुसार, पेट्रोलच्या दरांत कपात करणार असल्याचं सांगितलं आहे.
श्रीलंकेत डिझेलची किंमत अजूनही 430 श्रीलंकन रुपये प्रति लिटरवर कायम आहे. अशाप्रकारे डिझेलचे दर आता पेट्रोलपेक्षा जास्त झाले आहेत. गेल्या महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत घसरण होत आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरच्या खाली आली आहे. मात्र, भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत चार महिन्यांहून अधिक काळ कोणताही बदल केलेला नाही. अशा परिस्थितीत देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
दरम्यान, श्रीलंका सध्या आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत आहे. येथील महागाई ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. ऑगस्टमधील 64.3 टक्क्यांवरून सप्टेंबरमधील महागाई वाढून 69.8 टक्के झाली आहे. डिझेलच्या दरांत कपात झाल्यास नागरिकांना महागाईवर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, श्रीलंका सरकारनं पेट्रोलच्या किमतींवरच दिलासा दिला आहे. येत्या काळात सरकार डिझेलच्या किमतीही घटवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारतातील इंधन दरांची परिस्थिती काय?
IOCL नं आजही पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. देशातील चार महानगरांतही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. यापूर्वी देशात 22 मे रोजी केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हा पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे दर (Diesel Price) घटले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना दरात दिलासा मिळाला होता. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत बदल करण्यात आला होता. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे सरकारनं व्हॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं होतं. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.