Paris Blast : पॅरिसमध्ये गॅस गळती होऊन मोठा स्फोट, भीषण अपघातात 37 जण जखमी
Paris Blast : मीडिया रिपोर्टनुसार, गॅस लीक होऊन इमारतीला आग लागली आणि मोठा स्फोट झाला अशी माहिती आहे.
Paris Fire Explosion : फ्रान्सची (France) राजधानी पॅरिसमध्ये (Paris) मोठी दुर्घटना घडली. पॅरिसच्या ऐतिहासिक लॅटिन क्वार्टरजवळील रस्त्यावर (Paris Blast) स्फोट झाला. मीडिया रिपोर्टनुसार, गॅस लीक होऊन इमारतीला आग लागली आणि मोठा स्फोट झाला अशी माहिती आहे. या स्फोटात इमारत कोसळली असून त्याखाली काही जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या स्फोटात 37 लोक जखमी झाल्याची (Paris Fire Explosion) माहिती समोर येत आहे. यातील चार जण गंभीर आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास मोठा स्फोट झाला.
गॅस गळती होऊन मोठा स्फोट, 37 जण जखमी
स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पॅरिसमधील वेल डी ग्रेसच्या इमारतीत वायू गळती होऊन (Paris Fire Explosion) स्फोट झाला. गृहमंत्री गेराल्ड डारमॅनिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अद्यापही काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. श्वान पथकाच्या मदतीने रुई सेंट-जॅकमध्ये पसरलेल्या ढिगाऱ्याखाली बेपत्ता नागरिकांचा शोध सुरु आहे. रात्रभर हे बचावकार्य सुरु होतं.
Huge Explosion reported in Paris #paris pic.twitter.com/1J8hQjicz6
— Ashoke Raj (@Ashoke_Raj) June 21, 2023
इमारतीचा काही भाग कोसळला
पॅरिसचे पोलीस प्रमुख लॉरेंट न्युनेझ यांनी सांगितलं की, आगीमुळे इमारतीचा काही भाग कोसळला आहे. आग आटोक्यात आणली असली तरी आग विझवता आलेली नाही. सध्या अग्निशमन दलाचे पथक ढिगाऱ्याखाली कुणी अडकले आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. हा परिसर पोलिसांनी सील केला आहे. प्राथमिक माहितीनुसार गॅस गळतीमुळे आग लागल्याची माहिती आहे.
आगीमुळे परिसरात तणावाचं वातावरण
फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमॅनिन यांनी पॅरिसच्या फिट प्रांतातील रुई सेंट-जॅकमध्ये जार्डिन डु लक्झेंबर्ग आणि सोरबोन विद्यापीठाजवळील आगी लागल्याचं सांगितलं आहे. तसेच, आगीमुळे परिसरात तणाव असल्याची माहिती अॅरोनडिस्समेंटचे महापौर फ्लोरेन्स बर्थाउट यांनी दिली आहे. स्फोटामुळे इमारतीच्या काचा खाली पडत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आगीचं मुख्य कारण काय?
सध्या आगीचं मुख्य कारण सांगणं कठीण आहे. गॅसच्या स्फोटामुळे आग लागल्याच्या वृत्ताला आम्ही अद्याप दुजोरा देऊ शकत नाही, अशी माहिती पॅरिस पोलिसांच्या प्रवक्त्या लुबना अट्टा यांनी दिली आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. श्वान पथकांच्या मदतीने त्यांचं शोधकार्य सुरु आहे.