Titanic Submarine : टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी अजूनही बेपत्ता, पाकिस्तानी अब्जाधीशासह 5 जणांचा जीव धोक्यात
Titan Submarine Missing : बेपत्ता पाणबुडी शोधण्यासाठी अमेरिका आणि कॅनडाच्या नौदलाकडूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पाकिस्तानी अब्जाधीशासह 5 जणांचा जीव धोक्यात आहे.
Missing Titan Submarine : टायटॅनिकचे (Titanic) अवशेष पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी अद्याप बेपत्ता (Titan Submarine Missing) आहे. या पाणबुडीचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे या बेपत्ता पाणबुडीतील पाच प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. या पाणबुडीत फक्त काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याने धोका वाढत आहे. ही पाणबुडी उत्तर अटलांटिक महासागरातील 300 मैल परिसरात कुठेही असू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बेपत्ता पाणबुडी शोधण्यासाठी अमेरिका आणि कॅनडाच्या नौदलाकडूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
बेपत्ता पाणबुडीत काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक
टायटन (Titan Submarine) असे बेपत्ता झालेल्या पाणबुडीचे नाव आहे. या बेपत्ता पाणबुडीत आता केवळ काही तासांचा ऑक्सिजन शिल्लक आहे. अशा स्थितीत पाणबुडीच्या शोधात झालेला विलंब जहाजातील प्रवाशांच्या जीवाशी खेळ ठरणार आहे. पाकिस्तानी अब्जाधीश शहजादा दाऊद आपल्या मुलासह या पाणबुडीमध्ये आहेत. ही पाणबुडी पाण्यात उतरल्यावर अवघ्या एक तासाच्या आत तिचा संपर्क तुटला.
कशी आहे टायटन पाणबुडी?
टायटन पाणबुडी 22 फूट लांब आणि 9.2 फूट रुंद आहे. या पाणबुडीचे वजन 10432 किलो असून त्याच्या बाह्य आवरणावरील खिडकी टायटॅनियमपासून बनलेली आहे. याशिवाय या पाणबुडीत बसलेल्या प्रवाशांसाठी काही तास पुरेल इतका ऑक्सिजनही उपलब्ध आहे. पाणबुडी पाण्यात बुडल्यानंतर 45 मिनिटांतच गायब झाली. या पाणबुडीच्या पुढील भागात 380 मिमी अॅक्रेलिक व्ह्यूपोर्ट आहे. याशिवाय टायटन पाणबुडीच्या वरच्या भागातही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे पाणबुडीच्या आत बसलेल्या लोकांना बाहेरील दृश्य उत्तमप्रकारे दिसतं.
टायटन पाणबुडीची जबाबदारी कुणाकडे?
टायटॅनिक जहाजाचे बुडालेले अवशेष दाखवण्यासाठी गेलेल्या पाणबुडीची जबाबदारी पोलर प्रिन्स नावाच्या जहाजाने घेतली आहे. पोलर प्रिन्स जहाजाने टायटन पाणबुडीला उत्तर अटलांटिक महासागरात नेले. यानंतर टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत पोहोचल्यावर पाणबुडी पाण्यात उतरवली जाते. या पाणबुडीत एकावेळी फक्त चार ते पाच प्रवासी बसतात. यानंतर, पाणबुडी 4000 मीटर खोलीवर पडलेल्या टायटॅनिकच्या अवशेषासाठी रवाना झाली. पोलर प्रिन्स जहाज टायटन पाणबुडीच्या संपूर्ण प्रवासासाठी कमांड आणि कंट्रोल स्टेशन म्हणून काम करते.
अटलांटिक महासागरात युद्धपातळीवर शोध सुरु
अमेरिका आणि कॅनडा यांच्या नौदलाकडून युद्धपातळीवर शोधमोहिम सुरु आहे. पण, अजूनही पाणबुडी बेपत्ता आहे. पाणबुडीबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दोन्ही देशांच्या बचाव पथकाकडून पाणबुडीचा शोध सुरु आहे. टायटन पाणबुडीच्या शोधासाठी जहाजांचीही मदत घेतली जात आहे.