Pakistan : पाकच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आता अमेरिकेची शहरं? डोनाल्ड ट्रम्प यांना पाकिस्तानने खरा रंग दाखवला
Pakistan ICBM : पाकिस्तान आणि चीन मिळून एक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतासह जगाच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.

मुंबई : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला उद्देशून 'आय लव्ह यू' वक्तव्य केलं. पण त्याला काही तासांचा अवधी जातो न जातो तोच पाकिस्तानने अमेरिकेला खरा रंग दाखवला आहे. थेट अमेरिकेच्या वॉशिंग्टनला लक्ष्य करता येईल असं आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) विकसित करण्याचा कार्यक्रम पाकिस्तानकडून सुरू असल्याचं अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा अहवाल आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिकेमधील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिकेचे प्रतिष्ठित मासिक फॉरेन अफेयर्सने या संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार, भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान त्याच्या अणुशस्त्र क्षमतांचा विस्तार करण्याच्या दिशेने काम करत आहे. चीन या प्रक्रियेत पाकिस्तानला मदत करत आहे असे म्हटले जात आहे.
अमेरिकेला पाकिस्तान शत्रू घोषित करणार?
अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जर पाकिस्तानने जर आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केले तर अमेरिका त्याला 'अणुशक्तिशाली शत्रू' म्हणून घोषित करू शकते.
अमेरिकेला लक्ष्य करता येईल अशा क्षेपणास्त्राची निर्मिती जर कोणता देश करत असेल तर तो अमेरिकेचा शत्रू समजला जातो. असा कोणताही देश जो अमेरिकेच्या शहरांना निशाणा बनवू शकते त्याच्या विरोधात अमेरिका भूमिका घेते.
सध्याच्या घडीला रशिया, चीन आणि उत्तर कोरिया हे देश अमेरिकेचे शत्रू राष्ट्रे असल्याचं सांगितलं जातं. कारण या तीनही देशांकडे अमेरिकेला लक्ष्य करु शकतील असे क्षेपणास्त्र आहेत. आता जर पाकिस्तानने असे क्षेपणास्त्र तयार केले, तर त्या देशाला शत्रू म्हणून घोषित करू शकते.
पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांवर निर्बंध
गेल्या वर्षी, अमेरिकेने पाकिस्तानच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर निर्बंध लादले होते. यामध्ये पाकिस्तानच्या तीन प्रमुख संरक्षण कंपन्यांना लक्ष केले गेले होते. त्यांची मालमत्ता गोठवण्यात आली होती आणि अमेरिकन कंपन्यांना त्यांच्याशी व्यवसाय करण्यापासून रोखले गेले होते.
आयसीबीएम क्षेपणास्त्रांमध्ये अणु आणि पारंपरिक दोन्ही प्रकारचे शस्त्र असू शकतात. याची रेंज 5,500 किलोमीटरपर्यंत असू शकते. सध्या पाकिस्तानकडे कोणतेही आयसीबीएम नाही. मात्र त्यांच्याकडे शाहीन-3 नावाचे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज 2,700 किलोमीटर आहे. 2022 मध्ये पाकिस्तानने या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती.
जर पाकिस्तानने त्याचे अणुशक्तिशाली क्षेपणास्त्र विकसित केले तर यामुळे पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. भारताच्या तसेच जगभरातील सुरक्षा धोरणांवर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा :























