Iran : अमेरिकेकडून आण्विक तळांवर झालेल्या हल्ल्यात किती नुकसान झालं? इराणनं पहिल्यादा उत्तर दिलं, म्हणाले...
Iran Israel War: अमेरिकेनं बी-2 बॉम्बर्स द्वारे केलेल्या हल्ल्यात आण्विक तळांचं मोठं नुकसान झाल्याचं इराणनं मान्य केलं आहे.

Iran Israel War नवी दिल्ली : अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात आण्विक तळांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती इराणनं दिली आहे. इराणच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी अल जजीराला दिलेल्या मुलाखतीत ही बाब मान्य केली आहे.
इराणच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात आण्विक तळांचं किती नुकसान झालं याबाबत अधिक विस्तारानं महिती देण्यास नकार दिला. ते म्हणाले की आण्विक तळांचं मोठं नुकसान झालं आहे यात कोणताही संशय नाही.
अमेरिकेकडून बंकर बस्टर बॉम्बेचा वापर
अमेरिकेनं इराणमधील आण्विक तळांवर हल्ले करताना बंकर बस्टर बॉम्बेचा वापर केल्याची माहिती आहे. बंकर बस्टर बॉम्ब जमिनीखाली असलेल्या सुरक्षित ठिकाणांना नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंधामध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. इराणनं आण्विक कार्यक्रम सुरु ठेवणार असल्याचं म्हटल्यानं जगभरात तणाव वाढला आहे. पाश्चिमात्य देशांना इराण गुप्तता पाळत अणवस्त्र निर्मितीच्या दिशेनं पुढं जाऊ शकते, अशी भीती आहे.
इराणमध्ये इंटरनेट सेवा सुरु
इराणचे दूरसंचार मंत्री सत्तार हाशेमी यांनी देशात इंटरनेट सेवा पुन्हा सुर करण्यात आल्याची माहिती दिली. सत्तार हाशेमी यांनी पुन्हा अशी स्थिती निर्माण होणार नाही असं म्हटलं. इराणमध्ये 17 जूनपासून सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी इंटरनेटचा वेग कमी करण्यात आला होता.तर काही भागात इंटरनेट पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आलं होतं.
IAEA ला करायचेय आण्विक तळांची पाहणी
आंतरराष्ट्रीय अणवस्त्र एजन्सीचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी म्हटलं की आयएईएच्या तपास अधिकाऱ्यांनी इराणमधील आण्विक तळांची पाहणी करणं ही प्राथमिकता आहे. अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांनंतर तिथं किती नुकसान झालं याची पडताळणी करण्यासाठी IAEA ला तिथं जायचं आहे. इराणकडे किती संवर्धित यूरेनियम शिल्लक आहे याची देखील तपासणी IAEA ला करायची आहे.
























