(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तानात महागाईचे चटके, 900 रुपये किलोने विकलं जातंय खाद्यतेल!
पाकिस्तान हा देश सध्या अनेक आर्थिक संकटांतून जात आहे. सध्या या देशारवर मोठे कर्ज आहे. दरम्यान, येथे महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत, असे म्हटले जात आहे.
इस्लामाबाद : भारताचा शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला सध्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागतेय. गेल्या अनेक दिवसांपासून हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न केले जात आहेत. पण अद्याप यात म्हणावे तसे यश आलेले नाही. आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी या देशाकडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न केला जातोय. पण या संघटनेनं ठेवलेल्या अटी पाकिस्तानसाठी फारच कठीण ठरत आहेत. यामुळेच सध्या या देशापुढे आर्थिक संकट उभे राहिले असून मिळालेल्या माहितीनुसार येथे पिठाची किंमत 800 रुपये (पाकिस्तानी रुपये) प्रतिकिलो तर तेलाचा दर 900 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचला आहे. एका पोळीसाठी पाकिस्तानला जवळजवळ 25 रुपये मोजावे लागत आहेत.
पाकिस्तानमध्ये सामान्य नागरिक अडचणीत
पाकिस्तानमध्ये कॉस्ट ऑफ लिव्हिंगमध्ये (जगण्यासाठी लागणारा खर्च) सातत्याने वाढ होत आहे. येथे लोकांना दैनंदिन वापरातील वस्तू खरेदी करणे कठीण झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानी रुपयाचे मूल्य सातत्याने कमी होत आहे. जेवणासोबतच घर, आरोग्य, शिक्षण खर्चदेखील वाढला आहे. असे असताना पाकिस्तानने आपल्या अर्थसंकल्पात संरक्षण विभाकासाठी 15 टक्क्यांनी वाढीव तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 साठी तेथील सरकारने पाकिस्तानी लष्कराला 2,122 अब्ज रुपये दिले आहेत.
देशाचा जीडीपी तीन टक्के राहण्याची शक्यता
पाकिस्तानचे केंद्रीय अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांच्या मतानुसार पाकिस्तानचा आर्थिक विकास दर म्हणजेच जीडीपी 3.6 टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा हदर 3.5 टक्क्यांपेक्षा जास्त होता. सरकारचे असे म्हणणे असले तरी या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार पाकिस्तानचा आर्थिक विकास दर 2.38 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचा संपूर्ण अर्थसंकल्प 18,877 अब्ज रुपये (पाकिस्तानी रुपया) एवढा आहे.
कर्ज फेडण्यातच पाकिस्तानचा पैसा खर्च
पाकिस्तानने चीनकडून कर्ज घेतलेलं आहे. हे कर्ज फेडण्याचे पाकिस्तानपुढे मोठे आव्हान आहे. दुसरीकडे अर्थसंकल्पाचा मोठा भाग पाकिस्तान कर्ज फेडण्यात घालवत आहे. पाकिस्तानला 9700 अब्ज रुपयांचे लोन रिपेमेंटसाठी खर्च करावे लागणार आहेत. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनुसार तेथे महागाई दर 12 टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर या आर्थिक वर्षात देशात साधारण 12,970 अब्ज रुपये कराच्या माध्यमातून जमा होतील, अशी पाकिस्तानी सरकारला अपेक्षा आहे. अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांच्यानुसार आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी देश पुढे जात आहे. पाकिस्तानने नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याची घोषणा केलेली आहे.
हेही वाचा :