(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan News : नऊ महिन्यांची चिमुकली गर्भवती? शस्त्रक्रियेनंतर दोन किलोचं भ्रूण काढलं बाहेर; नेमका प्रकार काय?
Pakistan Fetus in Fetu Case : एका नऊ महिन्यांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातील बाळ बाहेर काढण्यात आलं. डॉक्टरांनी आधी वाटलं की ही ट्युमरची गाठ आहे.
मुंबई : नऊ महिन्यांच्या चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलं. पण, त्यानंतर जे समोर आलं त्यानं बाळाच्या पालकांसह डॉक्टरांनाही धक्का बसला. नऊ महिन्यांच्या मुलीला पोटदुखीवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या पोटात ट्युमर असल्याचं डॉक्टरांना वाटलं. डॉक्टरांनी चिमुकलीवर शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. पण, शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना चिमुकलीच्या पोटात चक्क दुसरं बाळ आढळून आलं, ज्याला आधी डॉक्टर ट्युमर समजत होते. ही धक्कादायक आणि विचित्र घटना पाकिस्तानातून समोर आली आहे.
नऊ महिन्यांची चिमुकली गर्भवती!
पाकिस्तानमध्ये पोटदुखीवर उपचारासाठी एका नऊ महिन्यांच्या चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांना त्या चिमुकलीच्या पोटात दुसरं बाळ सापडलं. डॉक्टर ज्याला ट्युमर समजत होते, ते दुसरं बाळ होतं, जे त्या चिमुकलीच्या पोटात होतं. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन हे दुसरं बाळ चिमुकलीच्या पोटातून बाहेर काढलं. वैज्ञानिक भाषेत याला 'फीटस इन फिटू' (Fetus in Fetu) असं म्हटलं जातं. ही धक्कादायक घटना पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सादिकाबाद शहरात घडली आहे.
पोटदुखीसाठी रुग्णालयात भरती, मात्र...
सादिकाबाद शहरातील शेख जायेद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये या चिमुकलीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णालयातील डॉ. मुश्ताक अहमद यांनी सांगितलं की, ही चिमुकली एक महिन्यांची असल्यापासूनच तिला पोटदुखीची समस्या होती. त्यानंतर पोटदुखी वाढल्यावर तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं. डॉ. मुश्ताक अहमद यांनी बीबीसी उर्दूला ही माहिती दिली आहे.
डॉक्टरांना वाटला ट्युमर
डॉ. मुश्ताक अहमद यांनी पुढे सांगितलं की, चिमुकलीच्या पोटात पाण्याची पिशवी आणि ट्युमर यासारख दिसणार काही असल्याचं चाचण्यांमध्ये आढळून आलं. अल्ट्रासाउंड रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी चिमुकलीच्या पालकांना सांगितलं की, चिमुकलीवर त्वरीत शस्त्रक्रिया करुन ट्युमर हटवणं गरजेचं आहे. यामुळे चिमुकलीच्या जीवाला धोका असल्यामुळे पालकांनी आधी शस्त्रक्रियेला नकार दिला. पण, नंतर ते यासाठी तयार झाले.
चिमुकलीच्या पोटात सापडलं दुसरं बाळ
डॉ. मुश्ताक यांनी सांगितलं की, ऑपरेशन दरम्यान मुलीचं पोट उघडलं असता त्यात पाण्याची पिशवी आणि एक बाळं आढळलं. हे पाहून डॉक्टरही चक्रावले. या भ्रूणाचा चेहरा वगळता संपूर्ण शरीर मानवी बाळासारखं होतं. याचं कारण म्हणजे मानवी भ्रूणाचा विकास होताना चेहरा सर्वात शेवटी विकसित होतो. हे भ्रूण सहा ते सात महिन्यांचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
गर्भातून काढलेल्या भ्रूणाचं वजन दोन किलो
डॉक्टरांनी सांगितलं की, या चिमुकलीच्या पोटात सापडलेल्या भ्रूणाचे लहान आतडंही चिमुकलीशी जोडलेलं होतं. हे भ्रूण आतड्यांमधून चिमुकलीचं रक्त शोषत होतं. त्यामुळे ऑपरेशनमुळे चिमुकलीच्या जीवालाही धोका होता. मुलीचे वजन साडेआठ किलो होते, तर गर्भातून काढलेल्या भ्रूणाचं वजन दोन किलो होतं.
मुलीची प्रकृती ठीक
बीबीसी उर्दूच्या रिपोर्टनुसार, मुलीचे वडील आसिफ यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीची प्रकृती आता ठीक आहे. तिला हा त्रास एक महिन्याचा असताना सुरू झाला. सुरुवातीला आम्हाला काय समस्या आहे हे माहित नव्हतं. आम्ही तीन-चार डॉक्टरांकडे गेलो पण, आजाराची माहिती मिळू शकली नाही. शेवटी आम्ही डॉक्टर मुश्ताक यांच्यापर्यंत पोहोचलो. आसिफ शेती आणि गुरे पाळून उदरनिर्वाह करतात.
'फिट इन फिटू' काय आहे?
डॉ. मुश्ताक अहमद यांनी सांगितलं की, या चिमुकलीच्या समस्येला 'फिटू इन फिटू' म्हणून ओळखलं जातं. यामध्ये आईच्या पोटात दोन भ्रूण तयार होत असतात, पण एक मूल दुसऱ्या मुलाच्या शरीरात तयार होऊ लागतं. हे अतिशय दुर्मिळ प्रकरण आहे. अशी घटना 10 लाखांपैकी एका वेळी घडते. चिमुकलीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, या प्रकरणाबाबत अधिक माहिती घेतली जाईल, असं डॉक्टरांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :