(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Virus Death : ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगात पहिला बळी, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती
Omicron Virus Death : कोरोना महामारी आता कुठे आटोक्यात येत आहे, असं वाटत असतानाच ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने डोकं वर काढलं आहे.
Omicron Virus Death : कोरोना (Corna) महामारीने संपूर्ण जगाला मागील दोन वर्षांपासून विळखा घातला आहे. हा विळखा मागील काही महिन्यांत सैल होत आहे, असे वाटत असतानाच ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटने जन्म घेतल्याने संपूर्ण जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. दरम्यान नुकतीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी युकेमध्ये ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन किमान एका रुग्णाचा जीव गेल्याची माहिती दिली आहे. या माहितीमुळे ओमायक्रॉन व्हेरियंटही जीवघेणा असल्याचे समोर आल्याने जगभरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
बोरिस वेस्ट लंडनमधील पॅडिंग्टन येथे एका लसीकरण क्लिनीकला भेट देण्यासाठी आले असताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले,''दुर्देवाने ओमायक्रॉन चिंता वाढवत असून या व्हेरियंटची लागण झालेल्यांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तसंच किमान एका व्यक्तीचातरी आतापर्यंत ओमायक्रॉनची लागण होऊन मृत्यू झाला''
भारतातही ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या वाढतच चालली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश अशा अनेक राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. रविवारपर्यंत (12 डिसेंबर) देशातील एकूण ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 37 वर पोहचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्याशिवाय नागपूर, चंदीगढ आणि कर्नाटकमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. देशातील ओमायक्रॉन व्हेरियंटची संख्या 37 इतकी झाली आहे.
संबंधित बातम्या
- Omicron Cases : देशातील ओमायक्रॉन रुग्णाची संख्या 37, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
- लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मुंबई लोकलनं प्रवासाची मुभा देण्यावर ठाम आहात का? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
- Vaccine | लस खरेदीची आतापर्यंतची आकडेवारी सर्व तपशिलांसह सादर करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live