Nancy Pelosi : हा दौरा जिवंत लोकशाहीचं समर्थन, अमेरिका तैवानच्या पाठिशी खंबीर; नॅन्सी पेलोसी यांची पहिली प्रतिक्रिया
Nancy Pelosi Taiwan visit : अमेरिकेच्या या कृतीमुळे चीन चांगलाच संतापला असून त्यामुळे आशिया खंडावर युद्धाचे ढग जमा झाले आहेत.
तैपेई: आपला तैवान दौरा हा जिवंत लोकशाहीचं समर्थन असून अमेरिका नेहमीच तैवानच्या मागे खंबीर उभी असल्याचा विश्वास अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसी यांनी दिला. चीनच्या बॉंबस्फोटाच्या धमकीनंतरही नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये गेल्या असून उद्या त्या राष्ट्रपतींना भेटणार आहेत. नॅन्सी पेलोसींच्या या दौऱ्यामुळे चीन दावा करत असलेल्या एका लोकशाही देशामागे जगातली सर्वात जुनी लोकशाही उभी असल्याचा संदेश अमेरिकेने दिला.
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी आज तैवानच्या तैपेई विमानतळावर उतरल्या. त्यांनी जर तैवानच्या हद्दीत प्रवेश केला तर त्याचे परिणाम गंभीर होतील, तैपेई विमानतळ आम्ही बॉंबने उडवून देऊ अशी धमकी चीनने दिली होती. तशातही नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये आल्या असून त्यांनी आपल्या दौऱ्याचं समर्थन केलं आहे.
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका त्यांच्या मदतीला धावून येईल अशी त्या देशाला आशा होती. पण अमेरिकेने या युद्धापासून दोन हात लांबच राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे तैवानच्या बाबतीतही तसंच काहीसं होईल अशी चर्चा होती. पण चीनच्या धमकीनंतरही नॅन्सी पेलोसी या तैवानमध्ये आल्या. त्यामुळे अमेरिकेने यावेळी आपली भूमिका बदलून चीनला योग्य तो संदेश दिला असल्याचं सांगितलं जातंय.
गेल्या 25 वर्षामध्ये पहिल्या अमेरिकन नेत्याची भेट
तैवान हा आपल्या वन चायना वन पॉलिसीचा भाग असून त्यामध्ये अमेरिकेने पडू नये अशी भूमिका आतापर्यंत चीनने घेतली आहे. तैवान हा एक लोकशाही देश असून त्यावर चीन आपला दावा सांगतोय. त्यामुळे तैवानवरुन या दोन देशांदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला आहे. याच कारणामुळे गेल्या 25 वर्षामध्ये कोणत्याही अमेरिकेच्या नेत्याने वा वरिष्ठ अधिकाऱ्याने तैवानला भेट दिली नाही. नॅन्सी पेलोसी या पहिल्याच नेत्या आहेत ज्यांनी 25 वर्षानंतर तैवानचा दौरा केला.
अमेरिकेच्या या कृतीमुळे मात्र चीन चांगलाच संतापला असून त्यांने आपल्या लष्कराचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. चीनने युद्ध सरावही सुरू केल्याच्या बातम्या आहेत.
आशिया खंड युद्धाच्या उंबरठ्यावर?
नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे आशिया खंडावर युद्धाचे ढग जमा झाले असून कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये युद्ध झालं तर या युद्धात अनेक देश ओढले जातील. चीनला रशियाने पाठिंबा दिला असून त्यांच्या बाजूने इराण या युद्धात उतरण्याची शक्यता असून अमेरिकेच्या बाजूने ऑस्ट्रेलिया, जपान युद्धात उतरतील