Morocco Earthquake: मोरोक्कोत 6.2 तीव्रतेचा भूकंप, 296 जणांचा मृत्यू, तर शेकडो जखमी, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती
Morocco Marrakesh Earthquake: उत्तर आफ्रिकेतील देश मोरोक्कोमध्ये भीषण भूकंप 296 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती
Morocco Earthquake: तुर्कस्ताननंतर आता उत्तर आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये (Morocco Earthquake Updates) भूकंपानं मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. या भूकंपामुळे (Earthquake Updates) आतापर्यंत 296 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भूकंपामुळे झालेला विध्वंस लक्षात घेता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनानं तात्काळ बचावकार्य सुरू केलं असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे.
उत्तर आफ्रिकेतील (North Africa) देश मोरोक्कोमध्ये (Morocco Marrakesh Earthquake) पहाटे झालेल्या भूकंपानं मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. मोरोक्कोमध्ये भूकंपानंतर अनेक इमारती कोसळल्या, ज्यामध्ये 296 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंपाची तीव्रता 6.8 असल्याचं सांगण्यात येत आहे. मोरोक्को प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या माराकेश शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, माराकेशपासून 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला आहे.
भारतीय वेळेनुसार, पहाटे 3 वाजून 41 मिनिटांनी मोरोक्कोत भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर आफ्रिकेत झालेल्या गेल्या 120 वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. USGS नं म्हटलं आहे की, 1900 पासून या भागातील 500 किमी परिसरात M6 किंवा त्यापेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. येथे एम-5 पातळीचे केवळ 9 भूकंप नोंदवले गेले आहेत.
जुन्या इमारती कोसळल्या, लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले
माराकेशमध्ये राहणारे नागरीक ब्राहिम हिम्मी यांनी एजन्सीला सांगितलं की, भूकंपामुळे अनेक जुन्या इमारती कोसळल्या. लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आणि लोक घाबरुन सैरावैरा पळू लागले. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. ते म्हणाले की, लोक घाबरले आहेत आणि पुन्हा भूकंपाच्या भीतीने घराबाहेर पडले. भूकंपाशी संबंधित अंगावर शहारे आणणारे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शेअर केले जात आहेत.
क्षणार्धात होत्याचं नव्हतं
भूकंपामुळे इमारती कोसळण्याच्या सर्वाधिक घटना माराकेशच्या जुन्या शहरात घडल्या आहेत. प्रशासनासह नागरिकांनीही कोसळलेल्या इमारतींचा मलबा हटवण्याचं काम सुरू केलं आहे. शहरातील प्रसिद्ध लाल भिंतीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये एका भागात मोठ्या भेगा पडल्या असून काही भाग कोसळून त्याचा ढिगारा रस्त्यावर पडलेला दिसत आहे.
Extremely pained by the loss of lives due to an earthquake in Morocco. In this tragic hour, my thoughts are with the people of Morocco. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover at the earliest. India is ready to offer all possible assistance to…
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2023
कठिण काळात भारत सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरोक्कोमधील भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांपैकी संवेदना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, "मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे. हे वृत्त ऐकून अतिव दुःख झालं. या दुखःद प्रसंगी मोरोक्कोतील ज्यांनी आपले कुटुंबिय गमावले आहेत, त्याच्याप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. भारत या कठिण काळात मोरोक्कोला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे."