(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : हजारो लोक असलेल्या मॉलवर रशियाचा हल्ला, बळींच्या संख्येची कल्पना करणे अशक्य : झेलस्की
Russia Ukraine War : रशियाने आज पूर्व युक्रेनधील एका मॉलवर हल्ला केलाय. या मॉलमध्ये एक हजार पेक्षा जास्त लोक असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.
Russia Ukraine War : गेल्या चार महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. रशियाने आज पूर्व युक्रेनधील एका मॉलवर हल्ला केलाय. या मॉलमध्ये एक हजार पेक्षा जास्त लोक असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. द कीव इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरून याबाबत माहिती दिली आहे. 'रशियाने क्रेमेनचुकमधील शॉपिंग सेंटरवर हल्ला केला आहे. या शॉपिंग सेंटरमध्ये एक हजाराहून अधिक लोक होते. या मॉलला आग लागली असून अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत, बळींच्या संख्येची कल्पना करणे अशक्य आहे." असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
शॉपिंग सेंटरवर झालेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले असून 20 जण जखमी झाल्याचे युक्रेनियन अधिकाऱ्याने सांगितले. गर्दीच्या ठिकाणी रशियाचे क्षेपणास्त्र हल्ला करण्याची ही दुसरी वेळी आहे. याआधी युक्रेनने दावा केला होता की, रविवारी कीवमधील एका निवासी इमारतीवर हल्ला केला होता. कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एका मुलासह चार जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, जर्मनीच्या बव्हेरियन आल्प्समध्ये जी-7 शिखर परिषद सुरू असतानाच रशियाने युक्रेनमधील हल्ले तीव्र केले आहेत. असा दावा झेलेन्स्की यांनी केलाय. यावेळी झेलेन्स्की यांनी शिखर परिषदेला उपस्थित असणाऱ्या नेत्यांना रशियाचे आपल्या देशावरील आक्रमण थांबवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन केले. रशियावर कडक निर्बंध घालण्याची मागणी देखील यावेळी झेलेन्स्की यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या