रशिया-युक्रेन युद्धानंतर जगात वाढली अण्वस्त्रांची मागणी, जाणून घ्या भारत आणि चीनकडे किती अण्वस्त्रे आहेत?
Nuclear Armed States : SIPRI च्या ताज्या अहवालानुसार, चीन अण्वस्त्रांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनकडे 350 अण्वस्त्रे आहेत. तर भारताकडे 160 अण्वस्त्रे आहेत.
Nuclear Armed States : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या चार महिन्यांपासून युद्ध सुरू आहेत. दोन्ही देशांतील संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. अशातच एका अहवालानुसार जगात अण्वस्त्रांची मागणी वाढल्याचे समोर आले आहे. SIPRI ग्लोबल थिंक टँकचा 'इयर-बुक' अहवाल प्रसिद्ध नुकातच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार सर्व आण्विक देश त्यांच्या अण्वस्त्रांचा साठा वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत.
चीन आपल्या अण्वस्त्रांचा साठा वाढवत आहे, असे या अहवालात म्हटले आहे. रविवारीच चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी 'शांगरी-ला डायलॉग'ला अण्वस्त्रांच्या गरजेबाबत सविस्तर माहिती दिली. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात SIPRI च्या 'इयर बुक-2022' नुसार सध्या जगात एकूण 12,705 अण्वस्त्रे आहेत. यामध्ये रशियाकडे सर्वाधिक 5977 तर अमेरिकेकडे 5428 अण्वस्त्रे आहेत. युक्रेन युद्धादरम्यान रशियाने अनेकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे.
अण्वस्त्रांच्या शर्यतीत भारत कुठे?
SIPRI च्या ताज्या अहवालानुसार, चीन अण्वस्त्रांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनकडे 350 अण्वस्त्रे आहेत. तर भारताकडे 160 अण्वस्त्रे आहेत. पाकिस्तानकडे 165 अण्वस्त्रे आहेत. म्हणजेच चीन आणि पाकिस्तानकडे मिळून भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. SIPRI ने आण्विक शस्त्रांबाबतच्या आपल्या अहवालात चीनच्या अण्वस्त्रांची सविस्तर माहिती दिली आहे.
या अहवालात चीन सातत्याने अण्वस्त्रांचा साठा वाढवत असल्याचे म्हटले आहे. चीन किमान 300 क्षेपणास्त्र-सायलो म्हणजेच क्षेपणास्त्रांचे भांडार बांधत असल्याचे उपग्रह चित्रांवरून समोर आले आहे. याशिवाय काही अण्वस्त्रांचा वापर चिनी सैन्याने ऑपरेशनमध्ये केला आहे. याशिवाय चीन आण्विक क्षेपणास्त्रांसाठी मोबाईल लाँचरचाही वापर करत आहे. चिनी नौदलही आण्विक पाणबुड्यांचा वापर करत आहे.
रविवारी चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंग यांनी सिंगापूरमध्ये सांगितले की, ड्रॅगन स्वसंरक्षणासाठी अण्वस्त्रे तयार करत आहे. सिंगापूरमध्ये आयोजित शांग्री-ला डायलॉगला संबोधित करताना वेई म्हणाले की, अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या DF-41 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) चा 2019 साली चीनच्या लष्करी परेडमध्ये समावेश करण्यात आला आहे.