Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये भीषण अपघात! 131 फूट खोल दरीत कोसळली बस, 6 भारतीयांसह 18 जणांचा मृत्यू
Mexico Bus Accident : अपघातग्रस्त बसमध्ये 40 प्रवासी होते. ही बस मेक्सिको सिटीमधून टिजुआना येथे जात होती.
Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये (Mexico) बस 131 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 6 भारतीयांचाही समावेश आहे. अपघातग्रस्त बसमध्ये 42 प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. ही बस मेक्सिको सिटीमधून उत्तर-पश्चिमेकडील टिजुआना येथे जात होती. या भीषण बस अपघातामध्ये सुमारे 23 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, या बसमधून स्थानिक आणि विदेशी प्रवाशी होते. यावेळी बस दरीत कोसळून अपघता घडला.
भीषण अपघातात 6 भारतीयांसह 18 जणांचा मृत्यू
या भीषण बस दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तीन अल्पवयीन असल्याचंही सांगितलं जात आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 42 जण प्रवास करत होते. बस मेक्सिको सिटीपासून सॅन दिएगोच्या सीमेला लागून असलेल्या टिजुआनाला वायव्येकडे जात होती. अनेक स्थलांतरित तेथून अमेरिकेत आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात.
WATCH: #BNNMexico Reports.
— Nitish Verma (@nitsonnet) August 4, 2023
Death toll rises to 18 in Mexico bus crash, driver detainedhttps://t.co/4Kk1EGmklw#Mexico #Tepic #BusCrash #Accident #Breaking pic.twitter.com/WLt4rTLhB0
बसमध्ये सुमारे 42 प्रवासी
मेक्सिकन राज्यातील नायरित येथे गुरुवारी पहाटे महामार्गावरून बस दरीत कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांमध्ये अनेक भारतीय होते. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसमध्ये 42 प्रवासी आणि ड्रायव्हर होता. बसमधील बहुतांश प्रवासी परदेशी होते. बसमध्ये चढलेल्या परदेशी प्रवाशांमध्ये भारत, डोमिनिकन रिपब्लिक आणि आफ्रिकन देशांचे नागरिक होते. त्यातील काही अमेरिकन सीमेकडे जात होते.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
मेक्सिको राज्य सार्वजनिक सुरक्षा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बचावपथक अपघातग्रस्त बसमधून लोकांना बाहेर काढण्याचे काम करत असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सुरक्षा एजन्सीने फेसबुक पेजवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बसचालक अटकेत, तपास सुरु
मेक्सिकोची राज्याची राजधानी टेपिकजवळ हा भीषण अपघात घडला. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, बस मेक्सिको सिटीहून निघाली होती आणि तिजुआना या सीमावर्ती शहराकडे निघाली होती. नायरित राज्य सरकारने सांगितले की, बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. रस्त्याच्या वळणावर तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाला, असा अधिकाऱ्यांना संशय आहे.