(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मर्क (Merck)च्या नव्या औषधामुळे कोरोना रुग्णांना संजिवनी.. हॉस्पिटलचा खर्चही निम्म्याने घटणार
अमेरिकेतील मर्क (Merck Pharmaceutical) या नव्या औषध निर्मिती करणाऱ्या जर्मन कंपनीने कोरोना व्हायरसच्या (Corona virus) साथीवरील औषध तयार केल्याचा दावा केला आहे.
मुंबई : अमेरिकेतील मर्क (Merck Pharmaceutical) या नव्या औषध निर्मिती करणाऱ्या जर्मन कंपनीने कोरोना व्हायरसच्या साथीवरील औषध तयार केल्याचा दावा केला आहे. या औषधाने कोरोना रुग्णांना असलेला मृत्यूचा धोका कमी होईलच शिवाय रुगाणाचा हॉस्पिटलचा खर्चही जवळपास निम्म्याने कमी होईल असा दावा मर्क फार्मासिटिकलने केला आहे. रॉयटर्सच्या बातमीत या औषधाच्या प्राथमिक चाचणीचे निष्कर्ष मर्क ने शुक्रवारी जाहीर केल्याचा दावा केला आहे. या औषधाच्या वापरासाठी परवानगी मिळावी यासाठी एफडीएकडे लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार आहे. जर मर्क फार्मासिटीकलचा प्रस्ताव मान्य झाला तर कोरोनावरील हे पहिलं औषध असेल असा दावा कंपनीने केला आहे. तोंडाद्वारे घ्यावयाच्या या गोळीचं नाव मॉलनूपिरावीर (molnupiravir) असं आहे.
मर्क या जर्मनीच्या औषध निर्माण कंपनीने आणि त्यांची भागीदार असलेल्या रिजबॅक थेरपिटिक्स (Ridgeback Biotherapeutics) ने या गोळीच्या आपात्कालीन वापरासाठी अमेरिकेच्या एफडीएसह जगभरातील एफडीएकडे परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. मर्कचे सीईओ रॉबर्ट डेविस यांनी रॉयटर्सला सांगितलं की या गोळीच्या वापराने कोरोना रुग्णांवरील उपचार करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होईल. या मॉलनूपिरावीर (molnupiravir) औषधाच्या वापराला परवानगी मिळाली तर तोंडाद्वारे घ्यावयाचं हे कोरोनावरील जगातील पहिलं औषध ठरेल असा दावाही डेवीस यांनी केला आहे.
मर्क ची स्पर्धक कंपनी असलेल्या फायझर आणि स्वित्झर्लंडची औषध निर्माण कंपनी रोग होल्डिंग ही कोरोनावरील औषधाच्या संशोधनात अग्रेसर आहेत. मात्र आतापर्यंत त्यांना गोळीऐवजी फक्त इंजेक्शनद्वारे देण्याच्या अँटिबॉडी कॉकटेलच्या निर्मितीत यश मिळालं आहे.
मॉलनूपिरावीर (molnupiravir) या औषधाची प्राथमिक चाचणी 775 कोरोना रुग्णांवर घेण्यात आली. कोरोना व्हायरस बाधित रुग्णांना मॉलनूपिरावीर (molnupiravir) ही गोळी दर बारा तासांनी पाच दिवस देण्यात आली. त्याचे निष्कर्ष खूप सकारात्मक असल्याचा दावा मर्ककडून करण्यात आला आहे. जगभरात जवळपास पन्नास लाख लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी आलेल्या या औषधाच्या सकारात्मक निष्कर्षामुळे संशोधक समाधानी आहेत. मार्क ने सादर केलेल्या चाचणीच्या निष्कर्षांमध्ये मॉलनूपिरावीर (molnupiravir) च्या साईट इपेक्टविषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
मॉलनूपिरावीर (molnupiravir) च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांनाही सुरुवात झाल्याची माहिती मर्ककडून देण्यात आलीय.
चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांना कोरोनाव्हायरसची बाधा झालेली होती हे निश्चित झाल्यावरच त्यांची निवड करण्यात आली होती. या रुग्णांना कोरोनाची लक्षणेही होती शिवाय त्यांना कोमॉर्बिडिटी (सहआजार) होती. कोरोनाच्या सर्वाधिक प्रसारक्षम मानल्या गेलेल्या डेल्टा व्हेरीयंटवरही मॉलनूपिरावीर (molnupiravir) प्रभावशाली असल्याचा दावा मर्क ने केला आहे.
2021 च्या अखेरपर्यंत मॉलनूपिरावीर (molnupiravir) च्या एक कोटी गोळ्या उत्पादित करण्याचा विश्वास मर्क ने व्यक्त केला आहे. भारतातील काही जनरीक औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत मॉलनूपिरावीर (molnupiravir) च्या निर्मितीचा परवाना आणि फॉर्म्युला शेअर करण्यात येणार असल्याचं मर्क फॉर्मासिटीकल्सकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
या गोळीच्या चाचणी अहवालाचा आढावा घेण्यास आणि पुढील वापरासाठी परवानगी मिळण्यास एफडीएला किती वेळ लागेल याविषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही.