एका आठवड्यात भारतीय सैन्याला देशाबाहेर काढणार; मालदीवच्या राष्ट्रपतींचे वक्तव्य
India Maldives : राष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय सैन्याला एका आठवड्यात देश सोडून जावे लागणार असल्याचे मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी म्हटले.
नवी दिल्ली: भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेल्या मालदीवमध्ये (Maldives) झालेले सत्तांतर आता अडचणीचे होण्याची शक्यता आहे. मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू (Maldives president-elect Mohamed Muizzu) यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी मालदीवमधून भारतीय लष्कर हटवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले आहे. मुइझू हे चीन समर्थक समजले जातात. त्यांनी 'अल जझीरा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच ते भारतीय सैन्याला मालदीवमधून माघार घेण्याची विनंती करणार आहेत. हे काम प्राधान्य कामातील पहिले काम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू हे भारतीय सैन्याला द्वीपसमूहातून बाहेर काढण्याच्या त्यांच्या निवडणुकीतील आश्वासनावर ठाम आहेत. पण ते म्हणाले की ते मुत्सद्दी मार्गाने या समस्येचे निराकरण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुइझू पुढील महिन्यात, 17 नोव्हेंबर रोजी औपचारिकपणे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांना आशा आहे की जर शक्य असेल तर ते त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाच्या पहिल्या आठवड्यात भारतीय सैन्य माघार घेण्यास सांगतील.
मुलाखतीत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी म्हटले की, मी काही दिवसांपूर्वी भारतीय उच्चायुक्तांना भेटलो होतो आणि त्या भेटीदरम्यानच मी म्हणालो होतो की या समस्येला आमचे सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यांनी ते सकारात्मकपणे घेतले आणि पुढे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी ते आमच्यासोबत काम करतील असे सांगितले.
मालदीवमध्ये परदेशी सैन्याची आवश्यकता नाही
मोहम्मद मुइझू यांनी म्हटले की, “आम्ही शतकानुशतके शांतताप्रिय देश आहोत. आमच्या भूमीवर परकीय सैन्य कधीच नव्हते. आमच्याकडे कोणतीही मोठी लष्करी पायाभूत सुविधा नाही आणि आमच्या भूमीवर कोणत्याही परदेशी सैन्याच्या उपस्थितीने आम्हाला सुरक्षित वाटत नाही.
त्यांचे परराष्ट्र धोरण चीनकडे झुकणार का, असे विचारले असता मुइझू म्हणाले की ते मालदीव समर्थक धोरणाचे पालन करतील. आमच्या देशाचे हित सर्वप्रथम पाहिले जाईल. आम्ही कोणत्याही देशाला खूश करण्यासाठी पक्षपाती भूमिका घेणार नाही. आमचे हित आधी जपले जावे अशी आमची इच्छा आहे. जो देश आमचा आदर करेल तो आमचा चांगला मित्र असेल असेही त्यांनी म्हटले.
भारतासाठी मालदीव महत्त्वाचा
भारताच्या लक्षद्वीपपासून मालदीव 700 किलोमीटर अंतरावर असून, भारतीय भूभागापासून 1200 किलोमीटर अंतरावर आहे. या देशाशी अधिकाधिक चांगले संबंध ठेवणे भारतासाठी आवश्यक आहे. अन्यथा, तेथील चीनची वाढती उपस्थिती भारताच्या दृष्टीने धोक्याची घंटा ठरू शकते. गेली सहा दशके भारत आणि मालदीवचे राजनैतिक संबंध आहेत. भारताने सामाजिक व आर्थिक विकास, देश उभारणी आणि सागरी सुरक्षितता अशा अनेक क्षेत्रांत वेळोवेळी मालदीवला भरीव मदत केली आहे.