Mushaal Malik In Pakistan Cabinet: यासिन मलिकच्या पत्नीला मंत्री दर्जा; मानवाधिकार प्रकरणी पाकिस्तान पंतप्रधानांची विशेष सल्लागार
Mushaal Malik In Pakistan Cabinet : फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिक हिला पाकिस्तानच्या कॅबिनेट राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकड यांनी यासिन मलिकची (Yasin Malik) पत्नी मुशाल मलिकला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन' ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांनी 18 सदस्यीय मंत्रिमंडळात मुशाल मलिक यांची मानवाधिकार मुद्यांवर पंतप्रधानांच्या विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
मुशाल मलिक यांनी 22 फेब्रुवारी 2009 रोजी रावळपिंडीमध्ये यासिन मलिकसोबत विवाह केला. एका माहितीनुसार, 2005 मध्ये यासिन पाकिस्तान दौऱ्यावर असताना दोघांची भेट झाली होती. मुशाल लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीधर आहे.
मुशाल मलिक यांची आई, रेहाना हुसैन मलिक या पीएमएल-एन पक्षाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस होत्या. तिचे वडील, एमए हुसैन मलिक, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ होते. बॉन विद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्याशिवा, नोबेल पुरस्कार परीक्षक मंडळाचे ते पहिले पाकिस्तानी परीक्षक होते.
मुलीसोबत इस्लामाबादमध्ये वास्तव्य
यासिन मलिकची पत्नी मुशाल मलिकचा भाऊ हैदर अली हुसैन वॉशिंग्टनमधील नेव्हल पोस्ट ग्रॅज्युएट स्कूलमध्ये लेक्चरर आहे. तर, बहीण सबीन हुसैन मलिक या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मुशाल या 12 वर्षांची मुलगी रजिया सुल्तानासोबत इस्लामाबादमध्ये वास्तव्यास आहेत.
फुटीरतावादी नेता, यासिन मलिक सध्या तुरुंगात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने नोंदवलेल्या दहशतवादी-निधी पुरवठा प्रकरणातील गुन्ह्यात मलिकला 2019 च्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात दिल्ली न्यायालयाने मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
पाकिस्तानमध्ये लवकरच सार्वत्रिक निवडणूक
अन्वर-उल-हक-काकड यांना पाकिस्तानमधील आगामी सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमण्यात आले आहे. काकड हे बलुचिस्तान प्रांतातील एक पश्तून समुदायातील आहेत. बलुचिस्तान अवामी पार्टीचे ते नेते आहेत. येत्या काही महिन्यात पाकिस्तानमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. विद्यमान सरकारचा कार्यकाळ 12 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे.
कोण आहे यासिन मलिक
यासीन मलिक हा जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेचा म्होरक्या आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 90 च्या दशकात दहशतवादाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. त्याचवेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे रुबिया सईद यांचे अपहरण झाले होते. मुफ्ती मोहम्मद सईद हे जम्मू-काश्मीरचे मोठे नेते आणि नंतर ते मुख्यमंत्रीही झाले. मुफ्ती मोहम्मद सईद 1989 मध्ये देशाचे गृहमंत्री असताना त्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याच्या बातमीनं संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. रुबिया सईद यांच्या सुटकेसाठी सरकारनं 5 दहशतवाद्यांची सुटका केली होती. या संपूर्ण घटनेत जेकेएलएफचा नेता यासिन मलिक याचा सहभाग असल्याचे समोर आले. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणे, त्यांना पाठबळ देणे, निधी पुरवणे आदी आरोप मलिकवर आहेत.