Forbes World’s Billionaires List 2021: जेफ बेजोस सलग चौथ्या वर्षी पहिल्या स्थानी, टॉप 10 मध्ये अंबानींचाही समावेश
कोरोना संकटातही जगभरातील अब्जाधीशांसाठी हे वर्ष खास ठरलंय. फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादी अॅमेझॉनचे जेफ बेजोस सलग चौथ्या वर्षी अव्वल स्थानी कायम आहेत. तर भारताचे मुकेश अंबानी यांचाही टॉप 10 मध्ये समावेश आहे.
मुंबई : फोर्ब्सने 2021 मधील जगभरातील सर्वात श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार जगभरात कोरोनाव्हायरसच्या संसर्गानंतरही हे वर्ष अब्जाधीशांसाठी फारस खास ठरलं. यंदा जगतील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये 5 ट्रिलियन डॉलरची वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
493 नव्या व्यक्तींची एन्ट्री
फोर्ब्सनुसार यंदा क्रिप्टोकरन्सी आणि स्टॉकच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. परिणामी फोर्ब्सच्या 35 व्या यादीत जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत वाढ झाल्याचं दिसत आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत यावर्षी 493 नव्या व्यक्तींची एन्ट्री झाली आहे.
जेफ बेजोस सलग चौथ्या वर्षी पहिल्या स्थानी
फोर्ब्सच्या 35 व्या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यादीनुसार जेफ बेजोस यांच्याकडे 177 बिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे. अॅमेझॉनच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. एक वर्षापूर्वी त्यांची एकूण संपत्ती 64 बिलियन डॉलर होती.
दुसऱ्या स्थानावर इलॉन मस्क तर बर्नार्ड अरनॉल्ट तिसऱ्या क्रमांकावर
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर इलॉन मस्क आहेत. टेस्लाच्या शेअर्समध्ये 705 टक्क्यांच्या वाढीमुळेच ते 151 बिलियन डॉलर एवढ्या संपत्तीसह जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर फ्रान्समधील लक्झरी वस्तूंचे उद्योजक बर्नार्ड अरनॉल्ट हे आहेत. LVMH च्या शेअर्समध्ये 86 टक्क्यांची वाढ झाल्याने त्यांच्या संपत्तीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी 76 बिलियन डॉलर असलेली त्यांची संपत्ती यंदा 150 बिलियन डॉलर एवढी झाली आहे..
बिल गेट्स यांना चौथं स्थान
सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चारच उद्योजकांची संपत्ती 100 बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. या यादीत चौथ्या स्थानावर बिल गेट्स आहेत. बिल गेट्स यांची एकूण संपत्ती 124 बिलियन डॉलर आहे. बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट, कॅनाडाच्या नॅशनल रेल्वे आणि ट्रॅक्टर निर्माती डीरे अॅण्ड कंपनीच्या शेअर्सचे मालक आहेत.
पाचव्या क्रमांकावर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग
या यादीत पाचव्या क्रमांकावर फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचं नाव आहे. त्याच्या संपत्तीत यंदा 80 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. मागील वर्षी 42.3 बिलियन डॉलर असलेली त्याची संपत्ती यंदा थेट 97 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
96 बिलियन डॉलर एवढ्या संपत्तीसह वॉरेन बफेट या यादीत सध्या सहाव्या क्रमांकावर आहेत.
गुगलच्या संस्थापकांना आठवं आणि नववं स्थान
फोर्ब्सच्या 35 व्या यादीत यंदा लॅरी एलिसन यांना 93 बिलियन डॉलर संपत्तीसह सातवं स्थान मिळालं आहे. तर गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज (लॉरेन्स एडवर्ड पेज) यांनी 91.5 बिलियन डॉलर संपत्तीसह यादीत आठवं स्थान मिळवलं आहे. याशिवाय अमेरिकेचे कम्प्युटर सायन्टिस्ट आणि लॅरी पेज यांच्यासह गुगल आणखी एक सहसंस्थापक सर्गी ब्रिन या यादीत 89 बिलियन डॉलर संपत्तीसह नवव्या स्थानावर आहेत.
दहाव्या स्थानी मुकेश अंबानी
सध्या या यादीत दहाव्या स्थानावर भारतीय उद्योजक मुकेश अंबानी हे आहेत. यासोबतच मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक बनले आहेत. त्यांची अंदाजित संपत्ती 84.5 बिलियन डॉलर एवढी मोजण्यात आली आहे.