Israel strikes Iran: इस्रायलकडून इराणवर मोठा एअर स्ट्राईक, अणवस्त्र केंद्रांवर हल्ला, कमांडर्स अन् अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू
Israel strikes Iran: इस्रायलच्या या ऑपरेशनमध्ये अमेरिकेचा सहभाग असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, अमेरिकेकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला आहे. जगात युद्ध भडकणार?

Israel attack on Iran: इस्रायलकडून शुक्रवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या साहाय्याने मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलने इराणच्या राजधानीवर लढाऊ विमाने, क्षेपणास्त्र आणि ड्रोनमधून बॉम्बचा मारा केला. याशिवाय, इराणी लष्कराचे महत्त्वाचे तळ आणि अणवस्त्रं असलेल्या केंद्रांवरही इस्रायलने हल्ला केला. या हल्ल्यामुळे तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इराणच्या तब्बल 12 हून अधिक लष्करी तळ आणि अणवस्त्रं असलेल्या केंद्रांवर हल्ला केला आहे.
इस्रालयने अणवसत्रं असलेल्या केंद्रांवर केलेल्या हल्ल्यात इराणचे अनेक कमांडो जवान आणि अणुशास्त्रज्ञ ठार मारले गेल्याची माहिती आहे. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी म्हटले की, आम्ही इराणमधील मुख्य अणवस्त्र केंद्र असलेल्या नतांज येथील तळाला लक्ष्य केले. तसेच अणुबॉम्ब तयार करत असलेल्या वैज्ञानिकांनाही लक्ष्य करण्यात आले. याशिवाय, इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या तळावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर बेंजामिन नेत्यानाहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
इस्रायलने इराणवर केलेल्या या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटणार आहेत. या हल्ल्यामुळे पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची दाट शक्यता आहे. यु्द्धाच्या सावटामुळे जगभरातील भांडवली बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून आला. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल 850 अंकांनी कोसळला. तर निफ्टीमध्येही 265 अंकांनी कोसळला.
इराणी चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बाघेरी यांच्या मृत्यूचा दावा
इराणच्या लष्करी मुख्यालयावर, दोन अणुऊर्जा केंद्रांवर, IRGC (इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) च्या वरिष्ठ कमांडरांवर आणि अणुशास्त्रज्ञांवर लक्ष्य करून हल्ले करण्यात आले आहेत. इराणच्या सशस्त्र दलांचे चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद बाघेरी यांना ठार मारण्यात आले आहे, असा दावा देखील इस्रायलने केला आहे. दरम्यान, इराणच्या माध्यमांनी, दोन अणुऊर्जा स्थळांवर हल्ले झाल्याची पुष्टी केली आहे.
इस्रायल आणि इराण यांच्यात अनेक वर्षांपासून तणावाचे संबंध आहेत. इस्रायलने यापूर्वीही इशारा दिला होता की, जर इराणने शस्त्र बनवण्यायोग्य युरेनियमचा संवर्धन प्रकल्प सुरूच ठेवला, तर तो लष्करी कारवाई करेल. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, इराणचे युरेनियम संवर्धन कार्य आता शस्त्रनिर्मितीच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे इस्र्यालने इराणवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
आणखी वाचा
























