Israel-Palestine Escalation : हमासच्या इस्त्रायलवरील हल्ल्यानंतर गाझापट्टीवर रक्तपात; इस्त्रायलच्या प्रत्युत्तरात 198 मृत्यूमुखी
गाझामधील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 198 मृत्यूमुखी पडले आहेत. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कमीतकमी 198 लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर 1,610 हून अधिक लोक जखमी आहेत.
गाझापट्टी (पॅलेस्टाईन) : 'हमास'कडून इस्त्रायलवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर (Israel-Palestine Escalation) इस्त्रायलने सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं आहे. गाझामधील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 198 मृत्यूमुखी पडले आहेत. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कमीतकमी 198 लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर 1,610 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायल "युद्धात" असल्याचे घोषित करत सुमारे 50 वर्षांपूर्वी झालेल्या 1973 च्या युद्धाच्या आठवणींना उजाळा देत असल्याचे म्हटले आहे.
#WATCH | Israel PM Benjamin Netanyahu at the Security Cabinet meeting says, "Since this morning, the State of Israel has been at war. Our first objective is to clear out the hostile forces that infiltrated our territory and restore security and quiet to the communities that have… pic.twitter.com/THhgDmkKD0
— ANI (@ANI) October 7, 2023
दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांच्या वरिष्ठ सल्लागाराने हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याला पाठिंबा दर्शवला आहे. एएफपीच्या म्हणण्यानुसार, पॅलेस्टिनला पाठिंबा देण्यासाठी तेहरानमधील बैठकीत सल्लागार रहीम सफावी यांनी "proud operation" म्हणून उल्लेख केला. इस्रायलच्या बाजूनेही परिस्थिती तणावपूर्ण आहे. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यामुळे किमान 40 इस्रायलींना आपला जीव गमवावा लागला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. दक्षिणेकडील शहर Sderot च्या रस्त्यावर मृतदेहांचा खच पडल्याचे बोलले जात आहे. मात्र, निश्चित आकडा समोर आलेला नाही.
हमासला मोठी किंमत मोजावी लागेल
हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला कडक इशारा दिला. इस्रायल या अभूतपूर्व घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून हमासला "मोठी किंमत" मोजावी लागेल, असा इशारा दिला. इस्त्रायलमध्ये कमीतकमी 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. नेतान्याहू यांनी आज (7 ऑक्टोबर) शनिवारी सुरक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले की, इस्रायलचे प्राथमिक उद्दिष्ट दहशतवाद्यांचा नायनाट करून हल्ला झालेल्या दक्षिणी समुदायांवर पुन्हा नियंत्रण मिळवणे आहे. त्याचबरोबर गाझापट्टीमध्ये हमासला जबाबदार धरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
इस्त्रायलला शांत आणि एकजूट राहण्याचे आवाहन
चालू असलेल्या संघर्षात विजयाच्या अंतिम ध्येयावर भर देत त्यांनी राष्ट्राला शांत आणि एकजूट राहण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, व्हाईट हाऊसने हमासने केलेल्या हल्ल्यांचा निःसंदिग्धपणे निषेध केला. नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या प्रवक्त्या अॅड्रिन वॉटसन यांनी इस्त्रायलला अमेरिकेच्या पाठिंब्याची पुष्टी केली. इस्त्रायलींच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. दहशतवादाचे कधीही समर्थन होत नाही यावर त्यांनी भर दिला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी त्यांचे इस्रायली समकक्ष त्झाची हानेग्बी यांच्याशी संपर्क करत परिस्थिती जाणून घेतली. दोन्ही राष्ट्रे वाढत्या संकटाशी झुंज देत असल्याचे वृत्त एपीने दिले आहे. गाझापट्टीतून हमासने इस्रायलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यामुळे मोठी उलथापालथ झाली आहे. ज्यामध्ये हजारो रॉकेटचा गोळीबार आणि जोरदार तटबंदी असलेल्या सीमाभागात डझनभर सैनिकांची घुसखोरी समाविष्ट आहे. या हल्ल्याने मोठ्या सुट्टीच्या वेळी इस्रायलला असुरक्षित पकडले.
इतर महत्वाच्या बातम्या