Iran Israel War :अमेरिकेनंतर इस्त्रायल-इराण संघर्षात रशियाची एंट्री होणार? इराणचे विदेश मंत्री पुतिन यांना तातडीनं भेटणार
Iran Israel War : इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी मॉस्कोमध्ये जाऊन रशियाची अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं.

मॉस्को : अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमुळं इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धात अमेरिकेनं उडी मारल्याचं स्पष्ट झालं आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं देखील इशारा दिला आहे. तुम्ही सुरुवात केली आहे, आम्ही शेवट करु असा इशारा इराणच्या वतीनं देण्यत आला आहे. इराण आणि इस्त्रायल संघर्षात अमेरिकेच्या एंट्रीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींना वेग आला आहे. इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची हे तातडीनं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.
इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची हे रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना भेटण्यासाठी रवाना होणार आहेत. मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ते पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत. अराघची यांनी रशिया इराणचा मित्र असल्याचं म्हटलं, आम्ही नेहमी सल्लामसलत करत असतो, असंही ते म्हणाले. ते म्हणाले आज दुपारी मॉस्कोला जाणार आहे, तिथं उद्या सकाळी रशियाच्या अध्यक्षांसोबत गांभीर्यानं चर्चा करणार आहे. अब्बास अराघची हे इस्तंबूलमधील OIC या संघटनेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्षात अमेरिकेनं उडी घेतली आहे. अमेरिकेनं इराणमधील तीन आण्विक तळांवर हल्ले करण्यात आले आहेत. आता इराण रशियाची मदत घेणार का ते पाहावं लागेल. इस्त्रायलकडून इराणवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांबाबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पुतिन हे डोनाल्ड ट्रम्प विरोधक मानले जातात. पुतिन आणि खामेनी यांची जवळीक अमेरिकेचं टेन्शन वाढवू शकते.
इराणचे अध्यक्ष अराघची यांनी अमेरिकेनं तीन आण्विक तळांवर हल्ले केल्यानंतर मोठं वक्तव्य केलं आहे. इस्तंबूलमध्ये पत्रकारांसोबत बोलतना अराघची म्हणाले की आता स्थिती चर्चा किंवा वाटाघाटी करुन प्रश्न सोडवण्याची राहिली नाही. चर्चेचा मार्ग नेहमी खुला असला पाहिजे पण सध्या तशी स्थिती नाही. अमेरिकेच्या आक्रमक कारवाईनंतर इराण देखील आक्रमक झाला असून त्यांनी इस्त्रायलमध्ये हायपरसोनिक मिसाईलचा हल्ला सुरु केला आहे. ज्यामुळं प्रादेशिक तणाव वाढला आहे.
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील संघर्ष थांबण्याऐवजी आता चिघळला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं विनाअट शरणागती घ्यावी असा इशारा दिला होता. मात्र, इराणनं अमेरिकेपुढं न झुकण्याचं धोरण स्वीकारलं होतं. अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये हवाई हल्ले केले आहेत. अमेरिकेत ट्रम्प यांना देखील यामुळं टीकेला तोंड द्यावं लागत आहे.























