आता इराणचा पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक; दोन जवानांची केली सुटका
जैश-उल-अदल या दहशतवादी संघटनेने दोन्ही देशांच्या सीमाभागात पाकिस्तानच्या सीस्तान शहराच्या मेरवाका आणि बलुचिस्तान प्रांतातून 12 इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सचे अपहरण केले होते.
इराणने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तावडीतून आपल्या दोन जवानांना मुक्त केल्याचा दावा केला आहे. अमेरिका आणि भारतानंतर पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल ऑपरेशन करणारी इराण हा तिसरा देश आहे. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्सने (आयआरजीसी) बुधवारी सांगितले की त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत इंटेलिजेन्स कारवाईनंतर आपल्या दोन जवानांना सोडवून आणले.
मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. जैश-उल-अदल या संघटनेच्या तावडीतून आपल्या दोन जवानांना सोडविण्यात आले. या दोन्ही सैनिकांचे अडीच वर्षांपूर्वी अपहरण झाले होते. त्यांना यशस्वीपणे सोडवण्यात यश आल्याचे आयआरजीसीने एका निवेदनात म्हटले आहे.
जैश-उल-अदल संघटनेने 16 ऑक्टोबर 2018 रोजी दोन देशांच्या सीमेदरम्यान पाकिस्तानच्या सीस्तान शहराच्या मेरवाका आणि बलुचिस्तान प्रांतातून 12 इराणच्या रेव्होल्यूशनरी सैनिकांचे अपहरण केले. यानंतर त्यांना मुक्त करण्यासाठी तेहरान आणि इस्लामाबादच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या वतीने संयुक्त समितीची स्थापना केली गेली. यापैकी 15 नोव्हेंबर 2018 रोजी पाच इराणी सैनिकांना सोडण्यात आले तर 21 मार्च 2019 ला आणखी चार जवानांची सुटका करण्यात आली होती.
जैश-उल-अदल संघटनेला तेहरानने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. या दहशतवादी संघटनेने इराणमधील नागरी आणि सैन्य तळांवर अनेक हल्ले केले आहेत. बलुचिस्तानमधील निष्पाप लोकांच्या हत्याकांडासाठी या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानी सैन्याचा पूर्ण पाठिंबा मिळतो. या संघटनेने इराण सरकारविरूद्ध युद्ध पुकारले असून ते इराणमधील बलुच सुन्नीच्या हक्कांचे संरक्षण करीत असल्याचा त्यांचा दावा आहे.