इम्रान खान यांनी केलं भारताचं कौतुक, मरियम नवाज म्हणाल्या: 'तिकडेच निघून जा'
Imran Khan: पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजच्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांनी भारताचे कौतुक करणाऱ्या इम्रान खान यांना फटकारले आहे.
Imran Khan: पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजच्या उपाध्यक्षा मरियम नवाज यांनी भारताचे कौतुक करणाऱ्या इम्रान खान यांना फटकारले आहे. मरियम नवाज म्हणाल्या आहेत की, जर त्यांना (इमरान खान) भारत इतका आवडत असेल, तर त्यांनी तिथेच निघून जावे. तत्पूर्वी भारत सरकारने शनिवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे. यासोबतच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 12 सिलिंडरवर वर्षभरात 200 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून इम्रान खान यांनी भारत सरकारचे कौतुक केले आहे. इम्रान खान यांनी ट्वीट करत दक्षिण आशिया निर्देशांकाच्या अहवालाला टॅग केले आहे. ज्यात म्हटले आहे की, रशियाकडून अनुदानित तेल खरेदी केल्यानंतर भारत सरकारने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 9.5 रुपये, डिझेलच्या दरात 7 रुपयांनी कपात केली आहे.
इम्रान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे केले कौतुक
इम्रान म्हणाले आहेत की, भारताचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण आहे. त्यांनी अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेतले आणि नंतर नागरिकांना दिलासा दिला. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार पाडण्यात आले होते. त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. पाकिस्तानच्या राजकारणात अमेरिकेचा अवाजवी ढवळाढवळ आहे आणि त्यामुळेच आपल्या देशाचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही, असे आरोप त्यांच्याकडून सातत्याने होत होते. त्यांच्या दृष्टीने भारताने स्वतंत्र परराष्ट्र धोरण बनवले आहे, त्यामुळे त्याला कोणाच्याहीपुढे झुकण्याची गरज नाही.
भारताने अमेरिकेचा दबाव योग्य प्रकारे हाताळला: इम्रान
शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये इम्रान खान यांनी लिहिले आहे की, क्वाडचा भाग असूनही भारताने अमेरिकेचा दबाव योग्य प्रकारे हाताळला. त्यांच्या प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी रशियाकडून स्वस्तात तेलही विकत घेतले. आपले सरकारही पाकिस्तानात असेच काही साध्य करण्याचा प्रयत्न करत होते. हे सर्व स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या आधारे होऊ शकते.