Gold Vada Paav: वडापावला सोन्याची झळाळी! सोन्याच्या 'वडापाव'चा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल
Gold Vada Paav: सोन्याच्या 'वडा पाव'चा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
Gold Vada Paav: सध्याच्या काळात कधी काय येईल काही सांगता येत नाही. आता मी तुम्हाला म्हटलं की सोन्याचा वडापाव बाजारात आलाय तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? पण, सोन्याच्या वडा पावचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वड्यावर सोन्याचा मुलामा केलेला दिसत आहे. खास गोष्ट म्हणजे हा वडा ऐतिहासिक काळात खजिना ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या पेटाऱ्यात येत आहे. हा व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या उड्या पडल्यापासून जो-तो तोंडात बोटं घालत आहे.
मसरत दौड या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक जुना पेटारा उघडला जात असून यात सोन्याच वडा आणि पाव दिसत आहे. व्हिडीओवरती कॅप्शनमध्ये 22 कॅरेट गोल्ड असं लिहण्यात आलं आहे. या वडापाव तयार करण्याची पूर्ण प्रक्रिया यामध्ये दाखवण्यात आली आहे. यात पारंपरिक वड्यामध्ये बटर आणि चीजचा वापर करण्यात आलाय. वडा बेसन लावून तेलात तळून घेतल्यानंतर या वड्यावर 22 कॅरेटची सोन्याचे पातळ कागदाचे आवरण देताना दिसत आहे. या पेटीत वडापावसोबत फ्रेंच फ्राईजही दिसत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा वडापाव मिळतो तरी कुठं? हा वडापाव खाण्यासाठी तुम्हाला दुबईला जावं लागणार आहे.
#Gold_Vada_Paav This is what's wrong with the world: too many rebels without a cause. pic.twitter.com/JKeKsgOLEo
— Masarat Daud (@masarat) August 30, 2021
हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 15 हजारपेक्षा जास्त लोकांनी याला पाहिलं आहे.
महागाईचा फटका 'वडापाव'लाही
महागाईचा फटका आता हळूहळू सर्वसामान्यांच्या वडापावलाही बसू लागलाय. तेल, डाळ, गॅस अशा सगळ्याच गोष्टींचे दर वाढल्यामुळे वडापाव देखील महाग झालाय. वडापाव कुठे 15 रुपयांना विकला जातोय तर कुठे 20 ते 25 रुपयांना विकला जातोय. वडापावच्या या वाढलेल्या किंमतीचा परिणाम ज्यांच्यासाठी तो जेवणाला पर्याय ठरतो अशा सर्वसामान्यांवर होतोय.