(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फेसबुक आणि ट्विटरच्या 'फॅक्ट चेक लेबल' मुळे अमेरिकेत निवडणुकीतील अफवांना बसला आळा, ट्रम्प यांचे अनेक मेसेज केले ब्लॉक
फेसबुक आणि ट्विटरने अमलात आणलेल्या फॅक्ट चेक लेबलच्या उपाययोजनेमुळे निवडणुकीतील मतमोजणीबाबत पसरणाऱ्या खोट्या बातम्यांवर नियंत्रण राहिले. या दोन्ही कंपन्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक मेसेज ब्लॉक करत त्याबाबतचे सत्य लोकांसमोर आणले.
वॉशिग्टन: फेसबुक आणि ट्विटरने अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फॅक्ट चेकचे लेबल लावले होते. मतमोजणी दरम्यान संबंधितांकडून चुकीचे दावे केले जाऊ नये आणि लोकांत चुकीची माहिती पसरु नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं.
मतमोजणी सुरु व्हायच्या आधीच फेसबुकची एक उच्चस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत फॅक्ट चेकच्या उपाययोजनेचा अवलंब करण्याचे ठरले. मतमोजणी दरम्यान हे दोन्ही उमेदवार आपापल्या विजयाचा दावा करु शकतात, त्यामुळे लोकांत चुकीची माहिती पसरु शकते, अफवा पसरु शकते. या शक्यता लक्षात घेता दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर फॅक्ट चेकचे लेबल लावण्याचा निर्णय फेसबुकने घेतला. ट्विटरने ही उपाययोजना आधीपासूनच अंमलात आणली आहे.
फेसबुक आणि ट्विटरने अमरिकन निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा आणि चुकीची माहिती पसरवण्याविरोधात मोहिम सुरु केली. निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असता 4 नोव्हेंबरला डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले. त्यात ट्रम्पनी डेमोक्रॅटिक पक्षावर मते चोरण्याचा आरोप केला होता. त्यांनी लिहले होते की आपण मतदानात खूपच पुढे आहोत, पण विरोधक मत चोरीचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या ट्विटला ट्विटरकडून ब्लॉक करण्यात आले आणि संबंधित मजकूर वादग्रस्त असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सत्य बातम्यांच्या लिंकदेखील दिल्या.
We are up BIG, but they are trying to STEAL the Election. We will never let them do it. Votes cannot be cast after the Polls are closed!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 4, 2020
दुसऱ्या एका ट्विटमध्ये ट्रम्पनी निवडणूक जिंकल्याचा दावा केला. त्यावर ट्विटरने ती माहिती चूकीची आणि वादग्रस्त असल्याचे सांगत त्या ट्विटला ब्लॉक केले आणि मतमोजणीचे लेटेस्ट अपडेटस दिले. त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने ट्विटरने त्यांच्या दुसऱ्या पोस्टद्वारे मतमोजणीसाठी आणखी काही दिवस लागू शकतील असे सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर करण्यात आलेली कारवाई ही कंपनीच्या सिव्हिल इंटेग्रीटी पॉलिसी अंतर्गत करण्यात आल्याचे ट्विटरने स्पष्ट केले.
ANY VOTE THAT CAME IN AFTER ELECTION DAY WILL NOT BE COUNTED!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 5, 2020
ट्रम्पनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर हीच पोस्ट टाकली होती. त्यावरही फेसबुकने ट्विटरप्रमाणेच कारवाई केली. फेसबुकनेही ट्रम्प यांच्या विजयाच्या दाव्यानंतर लगेचच मतमोजणीच्या अपडेटसचे नोटिफिकेशन टाकायला सुरुवात केली. या नोटिफिकेशन फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या पेजवरुन सुरु होत्या. तसेच या दोन्ही उमेदवारांच्या पोस्टवर फॅक्ट चेकचे लेबल लावण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर त्या त्या कंपनीने फॅक्ट चेकचे लेबल जरी लावले असले तरी ट्रम्प यांनी केलेल्या चुकीच्या दाव्यांवर या कंपन्यांनी काही ठोस अशी कारवाई केल्याचे दिसून येत नाही. ट्रम्प यांनी 4 नोव्हेंबरला त्यांच्या मोठ्या विजयाची घोषणा करत त्या संध्याकाळी राष्ट्राला संबोधन करणार असल्याची माहिती फेसबुक आणि ट्विटरवरुन दिली होती.
THE OBSERVERS WERE NOT ALLOWED INTO THE COUNTING ROOMS. I WON THE ELECTION, GOT 71,000,000 LEGAL VOTES. BAD THINGS HAPPENED WHICH OUR OBSERVERS WERE NOT ALLOWED TO SEE. NEVER HAPPENED BEFORE. MILLIONS OF MAIL-IN BALLOTS WERE SENT TO PEOPLE WHO NEVER ASKED FOR THEM!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) November 7, 2020
काय साध्य होतं फॅक्ट चेक लेबलमुळे? एखाद्या ट्विटर वा फेसबुक अकाउंटला फॅक्ट चेक चे लेबल लावल्याने संबंधित व्यक्तीने चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला आळा बसतो. संबंधित ट्विट ब्लॉक होते, तसेच त्याला रिट्विट किंवा शेअर करता येत नाही आणि त्यावर कमेंटही करता येत नाही. त्या ट्विटखाली एक लिंक देण्यात आली असते. त्या लिंकला क्लिक केल्यानंतर त्यासंबंधीच्या खऱ्या बातम्या पहायला मिळतात. अशी उपाययोजना केल्यामुळे लोकांत चुकीची माहिती पसरत नाही, अफवा पसरत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कमी होते.
ट्विटरने या आधीच अशा प्रकारच्या फॅक्ट चेकची उपाययोजना केली आहे. फेसबुकने पहिल्यांदाच या निवडणुकीच्या दरम्यान या उपाययोजनेचा अवलंब केला. फेसबुकने ट्रम्प यांच्या मतांच्या चोरीच्या दाव्यासमर्थनात तयार करण्यात आलेल्या अनेक पेज आणि गटावरही बंदी घातली.
तज्ञांच्या मते फेसबुक आणि ट्विटरने ट्रम्प यांच्या अकाऊंटवर फॅक्ट चेकचे लेबल लावले नसते तर त्या रात्री ट्रम्प यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे अनेक अमेरिकन लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले असते. प्रसंगी कायदा व सुव्यवस्था बिघडली असती. निवडणूक प्रक्रियेत घोटाळा, निकाला आधीच विजयाची घोषणा आणि मतांची चोरी या आरोपामुळे लोकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असते. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली असती. दोन्ही बाजूचे समर्थक रस्त्यावर आले असते आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.
महत्वाच्या बातम्या:
'मी देशाला तोडणारा नाही तर जोडणारा राष्ट्रपती' विजयानंतर बायडन यांची पहिली प्रतिक्रिया
US Elections : कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती; भारताशी त्यांचा काय संबंध?