Elon Musk : रुग्ण फक्त विचार करून कम्प्युटर माऊस नियंत्रित करू शकतो, न्यूरालिंकबाबत इलॉन मस्कचा मोठा दावा
Neuralink : न्यूरालिंकने गेल्या महिन्यात पहिल्यांदा रुग्णाच्या मेंदूमध्ये एक चिप प्रत्यारोपित केली होती. आता तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला असल्याची माहिती आहे.
मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्कने (Elon Musk) मोठा दावा केला आहे. न्यूरालिंकने (Neuralink) या वर्षी जानेवारीमध्ये सर्जिकल रोबोटच्या सहाय्याने पहिल्या रुग्णाच्या मेंदूमध्ये एक चिप प्रत्यारोपित केली. हा रुग्ण फक्त विचार करून कम्प्युटरचा माऊस हलवू शकतो असा दावा इलॉन मस्कने केला आहे. तो पेशंटही सध्या पूर्णपणे ठिक आहे. तसेच ब्रेन चीपच्या त्यावर कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत.
अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कची कंपनी न्यूरालिंकने गेल्या महिन्यात पहिल्यांदा रुग्णाच्या मेंदूमध्ये एक चिप प्रत्यारोपित केली होती. आता तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे आणि केवळ त्याच्या विचाराने संगणक माऊस वापरण्यास सक्षम आहे.
आता न्यूरालिंकच्या माध्यमातून या रुग्णाकडून माऊसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे या रुग्णाकडून जास्तीत जास्त माऊस क्लिक केलं जात आहे. इलॉन मस्कने हा दावा जरी केला असला तरीही कंपनीकडूनच या यशाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. न्यूरालिंकला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यूएस एफडीएकडून मानवांमध्ये ब्रेन-चिप चाचण्या करण्यासाठी परवानगी मिळाली होती.
रोबोटने चिप बसवली होती
या प्रयोगासाठी न्यूरालिंकने काही स्वयंसेवकांची निवड केली होती. यापैकी एका रुग्णाच्या मेंदूवर रोबोटने ब्रेन चिप बसवली होती. हे मेंदूच्या त्या भागात प्रत्यारोपित केले गेले होते जे आपल्या हालचाल करण्याच्या विचारावर नियंत्रण ठेवते. रुग्णांना केवळ विचार वापरून कम्प्युटर कर्सर किंवा कीबोर्ड नियंत्रित करण्यास सक्षम करणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय आहे.
इलॉन मस्कच्या दाव्यानुसार, कंपनीला यामध्ये काही प्रमाणात यश मिळाले आहे. 2030 पर्यंत 22 हजार लोकांमध्ये ब्रेन चिप्स प्रत्यारोपित करण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. या मेंदूच्या चिपच्या मदतीने लठ्ठपणा, नैराश्य आणि स्किझोफ्रेनियासारख्या मानसिक स्थितींवर उपचार करता येतात.
न्यूरालिंक काय आहे? (What is Neuralink?)
न्यूरालिंक ही एलॉन मस्क यांची कंपनी आहे. एलॉन मस्क यांच्यासोबत सात वैज्ञानिकांच्या टीमने न्यूरालिंक कंपनीची स्थापना केली. 2016 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. न्यूरालिंक (Neuralink) कडे 400 हून अधिक कर्मचारी आहेत.
इलॉन मस्क यांनी ही ब्रेन चिप एका खास उद्देशाने तयार केली आहे. याद्वारे व्यक्ती आपल्या विचारानुसार स्मार्टफोन, लॅपटॉप या उपकरणांवर नियंत्रण ठेवू शकते.
ही बातमी वाचा: