Donald Trump : भारत पाकिस्तान संघर्षाचा पुन्हा दाखला, इस्त्रायल आणि इराण युद्ध थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
Israel Iran War:अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्त्रायल यांनी संघर्ष थांबवून सांमजस्य करार केला पाहिजे आणि ते करतील असं म्हटलं आहे.

Israel Iran War: इराण -इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरु आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर इराणनं ओमानची राजधानी मस्कटमध्ये होणारी अमेरिकेसोबतची अणूचर्चा देखील रद्द केली आहे. इराणनं या युद्धासाठी थेट अमेरिकेला जबाबदार धरलं आहे. या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्त्रायल संघर्षाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की ज्या प्रकारे मी भारत आणि पाकिस्तान यांचा वाद थांबवला. त्याप्रमाणं इराण आणि इस्त्रायल यांना एक करार केला पाहिजे. ज्यामध्ये अमेरिके सोबत व्यापाराचा वापर करुन दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, तर्क, सामंजस्य आणि विवेक आणता येईल. ज्यामुळं लवकर निर्णय घेतला जाऊ शकतो.
सर्बिया आणि कोसोवो यांच्यातील करार केला
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानच्या मुद्यासह इतर देशांची देखील नावं घेतली. सर्बिया आणि कोसोवो मध्ये कित्येक दशकांपासून सुरु असलेला संघर्ष युद्धाच्या उंबरठ्यावर होता. माझ्या पहिल्या कार्यकाळात तो संघर्ष थांबवला होता, असं ट्रम्प म्हणाले. ते पुढं म्हणाले बायडन यांच्या चुकीच्या निर्णयांमुळं दीर्घकालीन नुकसान झालं. मी हे पुन्हा ठीक करणार आहे, असं ट्रम्प म्हणाले.
मिस्र आणि इथियोपियाचा वाद सोडवला
डोनाल्ड ट्रम्प यांनी मिस्र आणि इथियोपियाचा वाद सोडवल्याचं म्हटलं. एका मोठ्या धरणावरुन त्यांच्यात संघर्ष होता. ज्याचा परिणान नाईल नदीवर होणार होता. तो संघर्ष माझ्या हस्तेक्षपामुळं थांबला. दोन्ही देशांमध्ये शांतता आहे. त्याचप्रमाणं डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि इराणमध्ये लवकरच शांतता प्रस्थापित होईल, असं म्हटलंय.
डोनाल्ड ट्रम्प इराण इस्त्रायल संदर्भात बोलताना म्हटलं की सध्या कॉल आणि बैठका सुरु होत आहेत. मी अनेक गोष्टी करतो पण कोणत्याही गोष्टीचं श्रेय घेत नाहीत. लोकांना गोष्टी समजतात हे ठीक आहे. मध्य पूर्वेला पुन्हा महान बनवूया, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष सुरु आहे. इराणच्या तेहरानमध्ये पाच कारमध्ये बॉम्ब स्फोट झाल्याची माहिती आहे. या घटनेसाठी इराणनं इस्त्रायलला जबाबदार धरलं आहे. इस्त्रायलकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी इराकनं एअर डिफेन्स सिस्टीम सक्रीय केली आहे.
भारत पाक संघर्षाबाबत अमेरिकेचे वारंवार दावे
भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे महिन्यात सुरु झालेला संघर्ष थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केला आहे. पहलगामचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. यानंतर भारत पाक संघर्ष सुरु झाला होता. 10 मे रोजी शस्त्रसंधी करण्यात आली होती.























