Donald Trump : ट्विटरला टक्कर? स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करणार डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. TRUTH Social असं या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नाव असणार आहे.
Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संदर्भात मोठी घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करणार आहेत. ज्याचं नाव 'ट्रुथ सोशल' (TRUTH Social) आहे. ट्रम्पचे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरसारखेच असेल, ज्यावर वापरकर्ते त्यांचे विचार, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतील. ज्यांनी माझ्यावर बंदी घातली अशा बिग टेक कंपनींच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण ट्रुथ सोशल मिडीया तयार केल्याचं ट्रम्प यांनी सांगीतलं आहे. आम्ही अशा जगात राहतो जिथे तालिबान ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे, तरीही तुमचे आवडते अमेरिकन अध्यक्ष शांत बसले आहेत. अशी खोचक टीकाही ट्रम्प यांनी यावेळी केली.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु करणार असल्याची घोषणा केली. अशातच त्यांनी यावेळी या प्लॅटफॉर्मचं नावंही जाहीर केलं. TRUTH Social असं या प्लॅटफॉर्मचं नाव असेल. याचे सर्व मालकी हक्क ट्रंप मीडिया एंड टेक्नोलॉजी ग्रुप (TMTG) यांच्याकडे असतील. याव्यतिरिक्त ग्रुप व्हिडीओ ऑन डिमांड सर्विसही सुरु करण्याचा विचार सुरु आहे.
डोनाल्ड ट्रंप यांनी बुधावरी TRUTH Social लॉन्च करणार असल्याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, "आमंत्रण देण्यात आलेल्या युजर्ससाठी याचं बिटा वर्जन नोव्हेंबरमध्ये उपलब्ध केलं जाईल. ट्विटरवर असलेल्या तालिबानला उद्देशून डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आपण एका अशा जगात राहतोय की, जिथे तालिबानची ट्विटरवर तालिबान सक्रिय आहे. असं असूनही तुमचे सर्वांचे आवडते राष्ट्रपती याबाबत मौन बाळगुन आहेत."
दरम्यान, ट्रम्प समर्थकांनी 6 जुलै रोजी अमेरिकन कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कारवाई करत त्यांची खाती निलंबित करण्यात आली होती. 75 वर्षीय रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी म्हणाले होते की, देशातील सर्वोच्च तंत्रज्ञान संस्था "बेकायदेशीर, असंवैधानिक सेन्सॉरशिपच्या प्रवर्तक" बनल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुक, ट्विटर आणि गुगल विरोधात दिला होता कारवाईचा इशारा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं की, ते तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी फेसबुक, ट्विटर आणि गूगलविरूद्ध खटला दाखल करणार होते. या कंपनीनी त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. वृत्तसंस्था एएफपीनं यासंदर्भात वृत्त दिलं होतं.