(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covaxin In Britain Approved List : कोवॅक्सिन लसीचा ब्रिटनच्या APPROVED LIST मध्ये समावेश
Covaxin In Britain Approved List : WHO ने नुकतीच कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे. डब्ल्यूएचओच्या मंजुरीनंतरच यूके सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
Covaxin In Britain Approved List : देशात ज्या लोकांनी स्वदेशी 'कोवॅक्सिन' लस घेतली आहे, त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी. भारतातील कोवॅक्सिन घेतलेल्या व्यक्ती कोणत्याही अडथळ्यांशिवाय ब्रिटनला जाऊ शकणार आहेत. ब्रिटन 22 नोव्हेंबरपासून कोवॅक्सिनचा मान्यता यादीमध्ये समावेश करणार आहे. यापूर्वी ब्रिटननं कोवॅक्सिनला मंजुरी दिली नव्हती. भारतीय बनावटीच्या कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यानंतर ब्रिटननेही लसीच्या वापरास मान्यता दिली आहे.
यापूर्वी कोवॅक्सिनला ब्रिटनने मान्यता दिलेली नव्हती. डब्ल्यूएचओनं काही दिवसांपूर्वी कोवॅक्सिनला मंजुरी दिली होती. डब्ल्यूएचओनं मंजुरी दिल्यानंतर ब्रिटन सरकारनं हा निर्णय घेतला. ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी सोमवारी ट्वीट केलं की, यूकेला जाणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी. जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर, आता 22 नोव्हेंबरपासून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतीयांना ब्रिटनच्या प्रवासादरम्यान सेल्फ-आयसोलेशन करावे लागणार नाही."
WHO कडून 3 नोव्हेंबर रोजी आपातकालीन वापराला मुंजरी
हैदराबादच्या भारत बायोटेक (Bharat Biotech) या लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीची निर्मिती असलेल्या कोवॅक्सिन लसीला आता जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाली आहे. कोवॅक्सिन ही भारताने बनवलेली स्वतःची कोरोना प्रतिबंधक लस आहे. जवळपास वर्षभरापूर्वीच भारत सरकारच्या औषध महानियंत्रकांनी या लसीच्या भारतातील वापराला परवानगी दिली होती. ही लस भारत बायोटेक सोबत आयसीएमआर आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेने एकत्रित रित्या बनवली आहे. दोन दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाने कोवॅक्सिन लसीला परवानगी दिली होती, त्याबद्धल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया सरकारचे आभार व्यक्त केले होते.
भारत बायोटेकचं संशोधन आणि निर्मिती असलेल्या या लसीला जागतिक आरोग्य संघटेनची परवानगी मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात येत असलेल्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. भारतातून अन्य देशांमध्ये जाणाऱ्यांनी कोवॅक्सिन लस घेतलेली असेल तर त्यांना संबंधित देशात गेल्यानंतर कॉरंटाईन नियमाचे पालन करावे लागत असे. डब्लूएचओची मान्यता मिळाल्यामुळे आता हा द्रविडी प्राणायम वाचणार आहे.
ऑस्ट्रेलियाकडून भारतीय कोवॅक्सिनला मंजुरी
जागतिक आरोग्य संघटनेकडून कोवॅक्सिनला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यासाठी टाळाटाळ होत असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सरकारने मंजुरी दिली आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या आरोग्य विभागाने भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन लशीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही लस घेतलेल्या 12 वर्षावरील नागरिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश मिळणार आहे. कोवॅक्सिन लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे, असे मानले जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या थॅरेप्यूटिक गुड्स एडमिनिस्ट्रेशनने (TGA)कोवॅक्सिनला मान्यता देण्याचा निर्णय घेतला. भारतातील ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओ'फेरेल एओ यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियन सरकारने प्रवाशांच्या लशीकरणाबाबतची योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मंजुरी दिली आहे.