Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला!
जागतिक आरोग्य संघटना चीनच्या बाबतीत गंभीर असती तर जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव झाला नसता, असं म्हणत अमेरिकेने WHO चा निधी रोखला.
वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे आलेल्या साथीने संपूर्ण जग संकटात आहे. चीनमधून सुरु झालेल्या या धोकादायक व्हायरसचा सर्वाधिक परिणाम महासत्ता असलेल्या अमेरिकेत पाहायला मिळत आहे. यामुळेच अमेरिकेते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेविरोधात कठोर भूमिका घेती आहे. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मिळणारा निधी रोखण्याचा आदेश दिल्याचं ट्रम्प यांनी काल (14 एप्रिल) मीडिया ब्रीफिंमध्ये सांगितलं.
खरंतर कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO बाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. जागतिक आरोग्य संघटाना चीन केंद्रित काम करत आहे. यानंतर त्यांनी WHO चा निधी रोखण्याचा इशाराही दिला होता. अखेर मंगळवारी (14 एप्रिल) त्यांनी यासंदर्भात घोषणाही केली. अमेरिकेकडून WHO ला दरवर्षी 400 ते 500 मिलियन डॉलरची मदत केली जाते. हीच मदत रोखण्यात येत आहे, असं ट्रम्प म्हणाले.
मीडियाशी बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प म्हणाले की, "WHO चा निधी रोखण्याचा आदेश दिला आहे." याशिवाय त्यांनी WHO वर कोरोना व्हायरसचं गांभीर्य लपवण्याचा आणि या प्रकरणी योग्य पावलं न उचलण्याचा आरोपही त्यांनी केला.
अमेरिकेचा WHO ला किती निधी? जागतिक आरोग्य संघटना ही जगभरात आरोग्य क्षेत्राबाबत काम करते. यादरम्यान वर्षभर काही ना काही उपक्रम सुरुच असतात. यासाठी प्रत्येक देश जागतिक आरोग्य संघटनेत गुंतवणूक करतो. ज्यात अमेरिका हा अनेक वर्षांपासून सर्वाधित निधी देणार देश आहे. अमेरिकेने मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेला 400 मिलियन डॉलर निधी दिला होता, जो WHO च्या एकूण बजेटच्या 15 टक्के आहे. या तुलनेत चीनबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा निधी अमेरिकेच्या निधीसमोर तूटपुंजा आहे. चीनने 76 मिलियन डॉलर एवढा निधी दिला होता. याशिवाय 10 मिलियन डॉलरची अतिरिक्त मदत केली होती. जर अमेरिकेने हा निधी रोखला तर WHO ला मोठा झटका बसेल असं खुद्द संघटनेनेही म्हटलं आहे. अमेरिकेने असा निर्णय घेण्याची ही वेळ नाही, असं WHO ने म्हटलं आहे.याशिवाय अमेरिकेने चीनसह अनेक देशांवर प्रवासबंदीचा निर्णय घेतला होता. परंतु हा अतिशय चुकीचा आणि धोकादायक निर्णय असल्याचं WHO ने म्हटलं होतं. तर "WHO च्या चुकीमुळे अनेक लोकांचा जीव गेला," असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसंच या प्रकरणाची चौकशी करावी असंही ते म्हणाले.
दरम्यान, अमेरिकेत आतापर्यंत सहा लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर या जीवघेण्या व्हायरसमुळे अमेरिकेत 25 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.