(Source: Matrize)
China Spy Ship : चीनच्या कुरापती सुरुच! हिंद महासागरात गुप्तचर जहाज, 'ड्रॅगन'चा इरादा काय?
Chinese Vessel Shi Yan 6 : हिंद महासागरात चीनचं गुप्तचर जहाज घुसलं असून ते वेगाने पुढे सरकत आहे. श्रीलंकेने भारताच्या धोक्याची सूचना दिली आहे.
China Ship in Indian Ocean : चीन (China) कुरापती करताना काही थकत नाही. एकीकडे सीमावर्ती भागात (India-China Border) चीनची घुसखोरी सुरु असून आता भारताच्या सागरी सीमांमध्ये (Indian Ocean) चीन घुसण्याचा प्रयत्न सुरु आहे. चीनचं शक्तिशाली गुप्तचर जहाज हिंद महासागरात घुसल्याची माहिती समोर आली आहे. चीनचं गुप्तचर जहाज 'शी यान 6' (Shi Yan 6) हिंद महासागरात दाखल झाले असून ते पुढे सरकत आहे. श्रीलंकेने यासंबंधित माहिती दिली आहे.
हिंद महासागरात चीनचं गुप्तचर जहाज
चीन भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. चीनबाबत आता श्रीलंकेने महत्वाची माहिती दिली आहे. चीनचं शक्तिशाली गुप्तचर जहाज 'शी यान 6' हिंद महासागरात घुसून पुढे सरकत असल्याचं श्रीलंकेने सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनचं गुप्तचर जहाज हिंद महासागराच्या मधोमध 90 अंश पूर्वेकडे आहे. हे जहाज सध्या श्रीलंकेच्या दिशेने पुढे जात असल्याची माहिती आहे.
भारतासाठी चिंतेची बाब
गेल्या काही वर्षांपासून चीनच्या हिंद महासागरात हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे. 2019 पासून आतापर्यंत चीनने सुमारे 48 चिनी वैज्ञानिक संशोधन जहाजे हिंद महासागरात तैनात केली आहेत. चीन हिंद महासागर क्षेत्रात हात-पाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने हिंद महासागराच्या आयओआर क्षेत्रात अनेक वैज्ञानिक जहाजे तैनात केली आहेत. ही जहाजे बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडे अरबी समुद्राच्या बाजूने पर्शियन गल्फकडे जाणाऱ्या क्षेत्रात आहेत.
चीनचं गुप्तचर जहाज शी यान 6
शी यान 6 हे एक वैज्ञानिक संशोधन जहाज असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. मात्र, हे गुप्तचर जहाज असल्याचा दावा इतर देशांकडून करण्यात येत आहे. शी यान 6 जहाज हे जहाज राष्ट्रीय जलीय संसाधन संशोधन आणि नॅशनल एक्वाटिक रिसोर्सेस रिसर्च अँड डेव्हलपमेंट एजन्सी (NARA) सोबत मिळून संशोधन करते, असं चीनचं म्हणणं आहे. पण, तज्ज्ञांच्या मते, हे चिनी हेरगिरीचे जहाज आहे.
जहाजाला कोलंबो बंदरात डॉक करण्याची परवानगी
शी यान 6 जहाज हे विज्ञान आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चीनच्या 13 व्या पंचवार्षिक योजनेतील एक प्रमुख प्रकल्प आहे. उद्घाटनानंतर दोन वर्षांनी, 2022 मध्ये या जहाजाने पूर्व हिंदी महासागरात आपला पहिला प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. श्रीलंकेच्या रानिल विक्रमसिंघे सरकारने ऑक्टोबरमध्ये या चिनी संशोधन जहाजाला कोलंबो बंदरात डॉक करण्याची परवानगी दिली आहे.