MonkeyPox treatment: कोविड लशीची मोहीम फत्ते करणाऱ्या ब्रिटीश शास्त्रज्ञांचे लक्ष मंकीपॉक्स उपचारांवर!
MonkeyPox Treatment: : कोरोनाला अटकाव करणाऱ्या लशीचा, उपचार पद्धतीचे शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांनी आता मंकीपॉक्सवरील लशीसाठी कंबर कसली आहे. यासाठी ब्रिटन सरकारने अनुदानही जाहीर केले.
MonkeyPox Treatment: : दोन वर्षांपूर्वी जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महासाथीला (Coronavirus) अटकाव करणारी लस आणि उपचार पद्धत विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आता मंकीपॉक्सला (Monkeypox) अटकाव करण्यासाठी कंबर कसली आहे. कोरोना लशीसाठी झटणारे काही शास्त्रज्ञांनी मंकीपॉक्सवरील उपचारांसाठीची चाचणी सुरू केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स आजाराच्या संसर्गाला आरोग्यविषयक आणीबाणी असल्याचे जाहीर केले आहे.
ऑक्सफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा एक गट मंकीपॉक्सवरील उपचारांसाठीच्या चाचणीसाठी काम करत आहे. या शास्त्रज्ञांनी कोरोना उपचाराबाबत महत्त्वाचे संशोधन केले होते. मंगळवारी या शास्त्रज्ञांनी मंकीपॉक्सवर प्रभावी ठरणाऱ्या उपचाराबाबत चाचणी सुरू केली आहे. 'प्लॅटिनम' असे या चाचणीला नाव देण्यात आले आहे. SIGA Technologies' (SIGA.O) च्या टेकोविरिमेट हे मंकीपॉक्सवर प्रभावी ठरणार आहे की नाही, हे पाहिले जाणार आहे.
देवीच्या आजारावर (Smallpox) प्रभावी ठरणारी लस विकसित करण्यात याआधीच यश आले आहे. या लशीमुळे मंकीपॉक्सचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र, मंकीपॉक्स आजारापासून बचाव अथवा उपचार पद्धत विकसित झाली नाही. मंकीपॉक्सचा संसर्ग जगभरात वेगाने फैलावत आहे. आतापर्यंत जवळपास 80 देशांमध्ये हा संसर्ग फैलावला असून 40 हजारांहून अधिक जणांना याची बाधा झाली आहे. यातील काही बाधितांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांपैकी 35 टक्के बाधित हे अमेरिकेतील आहेत. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सची 3000 हून अधिक बाधित आहेत.
मंकीपॉक्स संसर्गबाधितांच्या संपर्कात आल्याने या आजाराची लागण होते. सौम्य ताप येणे, चट्टे येणे, कांजण्यासारखे पुरळ उठणे, लिम्फ नोड्सना सूज येणे आदी लक्षणे दिसतात. मंकीपॉक्स आजारातून बरे होण्यासाठी किमान दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागू शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
ऑर्थोपॉक्सव्हायरसमुळे होणाऱ्या देवीचा आजार, मंकीपॉक्स आणि काउपॉक्स आदी आजारांना रोखणाऱ्या Siga कंपनीने विकसित केलेल्या Tpoxx या औषधाला युरोपियन युनियन आणि ब्रिटनने मंजुरी दिली आहे. मात्र, ब्रिटनमध्ये काही गंभीर प्रकरणांमध्ये या औषधांचा वापर केला जात आहे. अमेरिका आणि कॅनडात देवाच्या आजारासाठी हे औषध वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
देवीच्या आजाराचे जवळपास निर्मूलन झाले आहे. तर, काउपॉक्स आणि मंकीपॉक्स बाधितांची संख्या तुरळकपणे आढळतात. त्यामुळे मंकीपॉक्स बाधित व्यक्तींना हे औषध दिल्यास त्याचा किती परिणाम होतो, याचा अभ्यास आतापर्यंत करण्यात आला नव्हता.
ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी सुरू केलेल्या प्लॅटिनम चाचणीसाठी 3.7 दशलक्ष पौंड (4.5 दशलक्ष डॉलर) इतके अनुदान ब्रिटन सरकारने दिले आहे. या चाचणीत किमान 500 जणांना सहभागी करण्याचा प्रयत्न असणार आहे. चाचणीत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना 14 दिवस दोन वेळेस औषधे देण्यात येणार आहेत. त्यापैकी काहींना प्लेसबो (खोटं औषध) दिले जाणार आहे.
या चाचणीत आजारातून बरे होण्याचा दर, निगेटिव्ह चाचणी येण्याचा कालावधी आणि आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण आदींबाबीवर लक्ष दिले जाणार आहे. येत्या ख्रिसमसपूर्वी चाचणीचे परिणाम आपल्या हाती असतील असा विश्वास ऑक्सफोर्ड विद्यापीठातील Emerging Infections and Global Health आणि New Pandemic Sciences Institute चे संचालक सर पीटर हॉर्बी यांनी व्यक्त केला. मात्र, चाचणीसाठी स्वयंसेवक किती उपलब्ध होत आहेत, यावरही चाचणीचा निकाल अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.